मुंबई: मागच्या आठवड्यात IPL 2023 साठी ऑक्शन झालं. या ऑक्शनमध्ये एका खेळाडूला 13.25 कोटी रुपयाचा भाव मिळाला. हा खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्जकडून नाही खेळणार. हा विषय एकच प्लेयर आणि दोन वेगवेगळ्या टुर्नामेंटचा आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं. पुढच्यावर्षी दक्षिण आफ्रिका टी 20 लीग होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये हॅरी ब्रूकला चेन्नई सुपरकिंग्जची फ्रेंचायजी जोहान्सबर्ग सुपरकिंग्जने विकत घेतलं होतं. आता हॅरी ब्रूक SA20 league मध्ये खेळणार नाहीय.
हॅरी ब्रूक का खेळणार नाहीय?
SA20 league मध्ये न खेळण्याचा हॅरी ब्रूकचा स्वत:चा निर्णय नाहीय. त्याला ईसीबीने या लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या या खेळाडूने आपली काळजी घ्यावी, अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे. त्यामुळे हॅरी ब्रूक दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीगमध्ये खेळणार नाहीय.
दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये किती कोटीला विकत घेतलं?
ईसीबीने बुधवारी जोहान्सबर्ग सुपरकिंग्स मॅनेजमेंटला कॉल केला. हॅरी ब्रूकच्या वर्कलोड मॅनेजमेंटच त्यांनी कारण दिलं. त्यामुळे तो SA20 league मध्ये खेळणार नाहीय. “ब्रूक तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याला परवानगी देण्यात ईसीबीला धोका वाटतो. ईसीबीने रात्री उशिरा आम्हाला याबद्दल कल्पना दिली. त्याच्याजागी रिप्लेसमेंट म्हणून आम्ही दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरु करु” असं सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं. हॅरी ब्रूकला सुपरकिंग्सने 2.10 मिलियन रँड म्हणजे जवळपास 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय.
त्याच्यावर पैशांचा पाऊस
आयपीएलच्या ऑक्शनमध्ये हॅरी ब्रूक पहिल्यांदा उतरला होता. त्याच्यावर अक्षरक्ष: पैशांचा पाऊस पडला. सनरायजर्स हैदराबादने त्याला 13.25 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं. हॅरी ब्रूक टॉप ऑर्डरपासून मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतो. पाकिस्तानात या प्लेयरने आपली फलंदाजीची ताकत दाखवून दिली. पाकिस्तानी भूमीवर हॅरी ब्रूकने सलग तीन कसोटी शतकं ठोकली. त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. ब्रूकने 3 सामन्यात 93 पेक्षा जास्त सरासरीने 468 धावा ठोकल्या आहेत. त्याने आतापर्यंत 17 टी 20 सामन्यांपैकी फक्त एकाच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवलीय.