मुंबई: टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रेल्वेच्या टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, असा आरोप हसीन जहाँने केला आहे. गुरुवारी रात्री बिहारहून (Bihar) कोलकात्याला जात असताना टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, असा आरोप हसीन जहाँने केला आहे.
रेल्वे अधिकारी काय म्हणाला?
या प्रकरणात रेल्वेकडे अजून अधिकृत तक्रार आलेली नाही, असं पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करु असं आश्वासन या अधिकाऱ्याने दिलय.
हसीन जहाँ एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बिहारला गेली होती. तिथून कोलकात्याला परतत असताना, हा प्रकार घडला. जोगबानी एक्स्प्रेसमध्ये तिला अप्पर बर्थ देण्यात आला होता.
शिवराळ भाषा वापरली
“लोअर बर्थ रिकामी होता. सहप्रवाशाच्या विनंतीवरुन मी लोअर बर्थवर शिफ्ट झाली. गुरुवारी रात्री तिकीट तपासणारा कर्मचारी आला. त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने शिवराळ भाषा वापरली. कर्मचाऱ्याने माझा मोबाइलही फेकला. अखेर मी पोलिसांची मदत घेतली. त्यांच्या सुरक्षेत मी कोलकाकत्यात प्रवेश केला” असं हसीन जहाँने सांगितलं.
हार्दिक पंड्याचा फोटो पोस्ट केला
मागच्या महिन्यात आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हसीन जहाँने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिने हार्दिक पंड्याचा फोटो पोस्ट केला होता. हार्दिकच कौतुक करताना तिने शमीवर टीका केली होती. हसीन जहाँ मोहम्मद शमीपासून विभक्त झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून दोघे वेगवेगळे राहतात. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते.