मुंबई : आय़पीएलच्या चालू सीजनमध्ये फाफ डु प्लेसीसच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमसाठी एका सकारात्मक गोष्ट घडतेय. 2022 च्या सीजनमध्ये RCB ची टीम प्रतिओव्हर 8.46 धावा देऊन 30 चेंडूंमागे एक विकेट काढायची. पण आता 2023 च्या RCB साठी स्थिती पूर्णपणे बदलून गेलीय. या सीजनमध्ये आतापर्यंत 9 सामन्यात बँगलोर टीमने 7.3 च्या इकॉनमीने 22 विकेट काढलेत. या सीजनमधील ही सर्वोत्तम आकडेवारी आहे.
पावरप्लेमध्ये RCB च्या कामगिरीत विशेष सुधारणा झालीय. त्यामागे एकमेव कारण आहे, मोहम्मद सिराज. आरसीबीची टीम सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या विकेट काढते, त्यामागे मोहम्मद सिराजची जबरदस्त गोलंदाजी कारण आहे.
मागच्यावर्षी फ्लॉप
मागच्यावर्षी 2022 च्या मेगा ऑक्शनआधी मोहम्मद सिराजला रिटेन करण्यात आलं. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मागच्यावर्षीच्या सीजनमध्ये मोहम्मद सिराजची कामगिरी सुद्धा फार चांगली नव्हती. पण मोहम्मद सिराज ते सर्व मागे सोडून यंदाच्या सीजनमध्ये दमदार कामगिरी करतोय.
चेंडू जुना झाल्यावर यश नाही
जून 2022 पासून टीम इंडियासाठी सिराज 20 वनडे सामने खेळलाय. त्यात त्याने 38 विकेट काढल्या आहेत. 4.38 च्या इकॉनमीने नव्या चेंडूवर त्याने हे विकेट काढलेत. चेंडू जुना झाल्यानंतर मोहम्मद सिराजला तितक यश मिळत नाही. गोलंदाजांसाठीच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज जानेवारीत नंबर 1 होता.
पावरप्लेमध्ये किती विकेट घेतले?
न्यूझीलंड दौऱ्यात सिराजला टीम इंडियाच्या टी 20 संघात स्थान मिळालं, तेव्हा त्याने 6 विकेट काढले. आयपीएल 2023 मध्ये मोहम्मद सिराज विकेट टेकिंग बॉलर बनलाय. नऊ सामन्यात त्याने 15 विकेट घेतलेत. त्यात त्याने 8 विकेट पावरप्लेमध्ये घेतलेत. मोहम्मद सिराजने त्याच्या फिटनेसवर काम केलय. त्याशिवाय बॉलिंगमध्ये त्याने टेक्निकल बदल केलेत, असं आरपी सिंह यांनी सांगितलं. आरपी सिंह टीम इंडियाकडून खेळले आहेत.
मोहम्मद सिराजबद्दल आरपी सिंह काय म्हणाले?
“मी सिराजला बऱ्याच काळापासून बघतोय. तो भारतीय टीममध्ये आला, त्यावेळी त्याचा ग्राफ वर होता. हळूहळू तो खाली आला. पण त्याने बऱ्याच गोष्टींवर काम केलं, ही चांगली बाब आहे. फिटनेस एक महत्वाचा विषय आहे. टेक्निकल दृष्टीने बघाल, तर त्याने त्याच्या मनगटावर मेहनत घेतलीय. तो स्टम्प टू स्टम्प बॉलिंग करतोय” असं आरपी सिंह यांनी सांगितलं.
“मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. त्याचा ग्राफ असाच पुढे जात राहिला, तर तो भारताचा पुढचा मोहम्मद शमी बनेल” असं आरपी सिंहने सांगितलं.