Ashes 2021: राख भरलेल्या छोट्याश्या ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधलं महायुद्ध सुरु, जाणून घ्या अॅशेसचा इतिहास
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका आजपासून (8 डिसेंबर) सुरू झाली आहे. ही क्रिकेटची सर्वात मोठी मालिका असल्याचं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींसाठी अॅशेसपेक्षा मोठं काहीच नाही.
1 / 4
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका आजपासून (8 डिसेंबर) सुरू झाली आहे. ही क्रिकेटची सर्वात मोठी मालिका असल्याचं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींसाठी अॅशेसपेक्षा मोठं काहीच नाही. ही मालिका क्रीडा जगतातील सर्वात जुनी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे. अॅशेस मालिका एकदा इंग्लंडमध्ये आणि एकदा ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाते. यावेळी ही मालिका ऑस्ट्रेलियात होत असून पहिली कसोटी ब्रिस्बेन येथील गॅबाच्या मैदानावर खेळवली जात आहे. अॅशेसची ही 72 वी मालिका आहे. दोन्ही संघ दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करतात आणि अॅशेसचा विजेता खेळातील सर्वात लहान ट्रॉफी उंचावतो. यात पाच कसोटी सामने खेळवले जातात. पण अॅशेसची सुरुवात कधी झाली? आणि ही ट्रॉफी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी प्रतिष्ठेची का आहे? हे तुम्हाला माहितीय का?
2 / 4
अॅशेसची सुरुवात 1882 पासून झाली. यावेळी ओव्हल मैदानावर इंग्लंडला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने ब्रिटीश मीडियाला धक्का बसला. तिथे इंग्लंड क्रिकेटवर बरीच टीका झाली. द स्पोर्टिंग टाईम्स (The Sporting Times) नावाच्या वृत्तपत्राने एक मृत्यूपत्र (Obituary - एखाद्याच्या मृत्यूनंतरचा शोकसंदेश) प्रकाशित केले आणि त्याचे शीर्षक लिहिले - 'Death of English cricket' म्हणजेच इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू. तसेच मृतदेह पुरण्यात आला असून अॅशेस (राख) ऑस्ट्रेलियाला नेण्यात येणार असल्याचेही लिहिले होते.
3 / 4
पुढच्या वेळी जेव्हा इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा एका महिलेने बेल्सची एक जोडी जाळली आणि अत्तराच्या छोट्या बाटलीत ठेवली. नंतर त्या परफ्यूमच्या बाटलीच्या रूपात एक लहान ट्रॉफी बनवण्यात आली. तेव्हापासून फक्त राख असलेली ही छोटी ट्रॉफी विजेत्याला दिली जाते. त्याचबरोबर खेळाडूंना प्रतिकृतीही दिल्या जातात. मूळ राख असलेली ट्रॉफी लंडनमधील मेरीलेबॉन क्रिकेट क्लबच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
4 / 4
शेवटची अॅशेस मालिका 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली होती. ती मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. मात्र चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहिला कारण त्या आधीची स्पर्धा म्हणजेच 2017 ची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. 1972 नंतर पहिल्यांदाच ही मालिका बरोबरीत सुटली होती. 2015 मध्ये इंग्लंडने अखेरची अॅशेस मालिका जिंकली होती. आतापर्यंत 71 अॅशेस मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 33 वेळा तर इंग्लंडने 32 वेळा बाजी मारली आहे. सहा मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे 2021 सालची मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.