मुंबई : टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार यादव बेस्ट फलंदाज आहे. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज आहेत. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याच्याकडे टी20 क्रिकेटचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव याची बॅट चांगलीच तळपली. दुसऱ्या सामन्यात अर्धशतक, तर तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूत 100 धावा केल्या. या डावात त्याने 8 षटकार आणि 7 चौकार मारले. चौकार आणि षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला कसं रोखायचं? असा प्रश्न पडला आहे. भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने यासाठी काही खास टीप्स दिल्या आहेत.
क्रिकबजशी बोलताना झहीर खानने सांगितलं की, सूर्यकुमार यादव संपूर्ण मैदानात फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. सूर्यकुमार यादव लाँग ऑन, मिडविकेट वरून मारू शकतो. कव्हरच्या वरूनही षटकार मारण्याची क्षमता आहे. तसेच वेगवान गोलंदाजांच्या गतीचा योग्य पद्धतीने वापर करू शकतो. त्यामुळे गोलंदाजी करताना अडचण तर येणार. नेमका कुठे बॉल टाकायचा आणि कसं बाद करायचा असा प्रश्न पडतो.
“सूर्यकुमार यादव जेव्हा रिदममध्ये असतो तेव्हाच त्याला बाद करणं सोपं आहे. त्याच वेळेस त्याला चांगला टप्पा टाकणं महत्त्वाचं आहे. तसंच करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. यापेक्षा आणखी काही रणनिती नसते.”, असं झहीर खान याने सांगितलं. टी20 मालिकेनंतर भारतीय संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा पुढच्या वर्षी जूनमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित झाले आहेत. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तिकरित्या होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या दहा वर्षातील आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवणं शक्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.