T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया अखेर पाच दिवसांनी मायदेशात दाखल झाली आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाच्या मायदेशातील आगमनाला विलंब झाला. आज पहाटेच्या सुमारास टीम इंडिया स्पेशल विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल झाली. टीम इंडियाला मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयकडून खास स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर दाखल होताच विजेत्या टीमच थाटात स्वागत करण्यात आलं. चाहते मागच्या पाच दिवसांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. टीम इंडिया आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये उतरली आहे. टीम इंडियाचं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या तिघांनी खास केक कट केला.
टीम इंडियाचे खेळाडू या हॉटेलमध्ये फ्रेश होतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटीचा कार्यक्रम ठरला आहे. दिल्लीत मान्यवरांची भेट घेतल्यानंतर विजेत्या ट्रॉफीसह टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत दाखल होणार आहेत. वर्ल्ड कप विजेत्या टीमच मुंबईत जल्लोषात स्वागत करण्याची भारतीय क्रिकेटची परंपराच आहे. याआधी 2007 साली महेंद्रसिंह धोनीच्या विश्वविजेत्या टीमची मुंबईत अशीच भव्य व्हिक्ट्री परेड निघाली होती. ते क्षण आजही मुंबईकर विसरलेले नाहीत. आज पुन्हा एकदा मुंबईत टीमची अशीच भव्य व्हिक्ट्री परेड निघणार आहे.
किती तास चालणार व्हिक्ट्री परेड?
मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा मार्ग आहे. संध्याकाळी 5.00 वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलं आहे. जवळपास दोन तास ही व्हिक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे.
Live कुठे पाहता येईल व्हिक्ट्री परेड?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी या क्रीडा वाहिन्यांवर सकाळी 9 वाजल्यापासून व्हिक्ट्री परेडपर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्व घडामोडी पाहता येतील.
स्टार स्पोर्ट्स त्यांच्या You Tube चॅनलवरही लाइव्ह स्ट्रीमिंग करणार आहे.
BCCI.TV वर सुद्धा चाहत्यांना व्हिक्ट्री परेड पाहता येईल.