बंगळुरु: नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय IPL 2022 Mega Auction मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ काही उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन सहभागी झाला होता. संघासाठी खेळाडूंची निवड केल्यानंतर RCB समोर आता कर्णधार निवडीचा प्रश्न आहे. कारण विराट कोहलीने (Virat kohli) मागच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडले. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्यु प्लेसिसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सात कोटी रुपये खर्च केले. कर्णधारपदासाठी तो सुद्धा एक चांगला पर्याय आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेम मॅक्सवेल सुद्घा आहे. बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सचा नेतृत्व करण्याचा अनुभव मॅक्सवेलकडे आहे. त्याशिवाय 33 वर्षीय मॅक्सवेलने किंग्स इलेव्हन पंजाबचही नेतृत्व केलं आहे. त्यामुळे ड्यु प्लेसिस, मॅक्सवेल असे दोन पर्याय आरसीबी समोर उपलब्ध आहेत.
त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता
ग्लेन मॅक्सवेलच्या IPL चे सुरुवातीचे सामने खेळण्याबद्दल, साशंकता आहे. कारण पुढच्या महिन्यात त्याचं लग्न आहे. लग्नामुळे पुढच्या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावरही तो जाणार नाहीय. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका 29 मार्चला सुरु होणार आहे.
तारखांमध्ये दोन आठवड्यांचे अंतर होते
“सुरुवातीला क्रिकेट ऑस्ट्रेलिया बरोबर मी चर्चा केली, तेव्हा तारखांमध्ये दोन आठवड्यांचे अंतर होते. मला कुठल्या मालिकेवर पाणी सोडावे लागणार नाही, म्हणून मी आनंदी होतो” असे मॅक्सवेलने फॉक्स स्पोटर्सशी बोलताना सांगितले. मागच्यावर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर करारासंबंधी बैठक झाली, तेव्हा त्यांनी पाकिस्तान विरुद्ध मालिका होणार असल्याचं सांगितलं, असं मॅक्सवेल म्हणाला.
विराट विनंती मान्य करेल?
माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीने रिटेन केलं आहे. मॅक्सवेलला रिटेन करण्यासाठी RCB ने 11 कोटी रुपये मोजले आहेत. आरसीबी पुन्हा एकदा विराट कोहलीला कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती करु शकते. पण विराट ही विनंती मान्य करण्याची शक्यता कमी आहे. आरसीबीने दिनेश कार्तिक, फिन एलेनचा समावेश करुन फलंदाजीची बाजू मजबूत केली आहे. जोश हेझलवूड आणि जॅसन यांचा समावेश करुन गोलंदाजीत संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
Huge setback for RCB as star all rounder likely to miss start of IPL 2022