मुंबई : भारत (Indian Women Cricket Team) आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia Women Cricket Team) महिला क्रिकेट संघांमध्ये अलीकडेच पिंक बॉल डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या पूनम राऊतचा एक निर्णय जगभरातील क्रिकेटरसिकांना आवडला होता. अजूनही लोक त्याची चर्चा करत आहेत आणि पूनमची स्तुती करत आहेत. कारण या सामन्यात पूनम फलंदाजी करताना स्वतःहून पॅव्हेलियनमध्ये परतली होती. (I Listened to my soul, says Punam Raut on decision to walk towards pavilion in INDW va AUSW pink ball test)
मूळात पंचांनी पूनमला बाद घोषित केलं नव्हतं. ती बाद होती आणि तिला ते माहित होते. म्हणूनच तिने पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. त्यांच्याकडे न पाहता बॅट घेतली आणि पॅव्हेलियनच्या दिशेने गेली. सोफीचा चेंडू तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त उंच उडाला आणि तिच्या बॅटच्या कडेला स्पर्श करुन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले पण पंच काही निर्णय देण्यापूर्वीच पूनम पॅव्हेलियनमध्ये परतली होती.
आता पूनमने यावर तिचे मौन मोडले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने पूनमच्या हवाल्याने म्हटले की, “मला खात्री होती की पंच मला बाद घोषित करतील, कारण मी आउट होते. तिथे नक्कीच आवाज झाला होता. त्यामुळे मी क्रिझ सोडल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये माझ्यासोबत असे काही वेळा घडले आहे की, मी नाबाद असतानाही मला बाहेर जावे लागले आहे. पण हे माझ्या बाबतीत कधीच घडले नाही की, मला पंच बाद घोषित करणार नाहीत.
या कसोटीत यजमानांकडे DRS नव्हता. जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले, तेव्हा असे वाटले होते की, पंच त्यांचं अपील मान्य करणार नाहीत. पण राऊतने स्वतः परत जाण्याचा निर्णय घेतला. जर ती परत गेली नसती, तर यजमान संघाकडे डीआरएसही नव्हता आणि पूनम विकेटवर टिकून राहिली असती.
पूनम म्हणाली, “जर चेंडू बॅटला लागला नसता तर उगाच कोणी पव्हेलियनकडे का जाईल. ही एक खेळभावना आहे आणि प्रत्येकाकडे असायला. आम्हाला क्वचितच कसोटी सामने खेळायला मिळतात. म्हणून मला वाटते की, आपण खेळांचा आनंद का घेतो, आपण स्पर्धा का करतो? हे आपण विसरलो आहोत. तुम्ही फक्त तुमची विकेट वाचवण्यासाठी बेईमान होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण विसरुन चालणार नाही, ती म्हणजे हा खेळ आहे, हे काही युद्ध नाही.”
इतर बातम्या
PHOTO: आगामी T20 World Cup साठी सर्व देश रंगणार नव्या रंगात, जर्सीचा लूक व्हायरल
(I Listened to my soul, says Punam Raut on decision to walk towards pavilion in INDW va AUSW pink ball test)