नवी दिल्ली: अॅशेस मालिकेत (Ashes series) अॅडलेड मध्ये दुसरा कसोटी सामना गमावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटला (joe Root) दुहेरी धक्का बसला आहे. आयसीसीने कसोटीमधील फलंदाजांच्या ताज्या रँकिंगची यादी प्रसिद्ध केली आहे. या मध्ये जो रुटने पहिलं स्थान गमावलं असून त्याच्याजागी अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनने अव्वल स्थान मिळवलं आहे.
लाबुशेन करीअरमध्ये पहिल्यांदाच 912 गुणांसह रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जो रुट 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस सीरीजच्याआधी कसोटी क्रमवारीत लाबुशेन चौथ्या स्थानावर होता. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्याने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली व दुसऱ्या स्थानावर धडक मारली. अॅडलेड कसोटीत लाबुशेनने एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
करीअरमधील लाबुशेनचे हे सहावे आणि अॅशेसमधील पहिले शतक होते. या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 275 धावांनी हरवून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. मुंबईत न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होण्याचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसला. त्याच्या क्रमवारीत घसरण होऊन तो सातव्या स्थानावर आला. वनडे कर्णधार रोहित शर्मा टॉप 5 मध्ये कायम आहे. त्याच्या खात्यात 797 गुण आहेत. या दोघांशिवाय एकही भारतीय फलंदाज टॉप-10 मध्ये नाहीय.