ICC U-19 World Cup: भारताच्या युवा फलंदाजांनी युगांडाला अक्षरक्ष: धू धू धुतलं, विजयासाठी दिलं होतं 405 धावांचं टार्गेट

| Updated on: Jan 23, 2022 | 7:02 AM

कर्णधार यश धुलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने दुबळ्या युगांडावर मोठ्या विजयाची नोंद केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारताच्या दमदार कामगिरीसमोर नवख्या युगांडाचा निभाव लागला नाही.

ICC U-19 World Cup: भारताच्या युवा फलंदाजांनी युगांडाला अक्षरक्ष: धू धू धुतलं, विजयासाठी दिलं होतं 405 धावांचं टार्गेट
Follow us on

गयाना: भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली असतानाही ICC U-19 World Cup स्पर्धेत भारतीय संघाचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. कर्णधार यश धुलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने दुबळ्या युगांडावर मोठ्या विजयाची नोंद केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारताच्या दमदार कामगिरीसमोर नवख्या युगांडाचा निभाव लागला नाही. पूर्णपणे एकतर्फी झालेला हा सामना भारताने तब्बल 326 धावांनी जिंकला. अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuwanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने युगांडासमोर विजयासाठी विशाल लक्ष्य ठेवले होते.

अंगकृष रघुवंशी आणि राज बावा या दोघांनी युगांडाच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: धू धू धुतलं. सलामीला आलेल्या अंगकृष आणि राज बावा या दोघांनी चौफेर फटकेबाजी करुन धाव लुटल्या. अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. भारताने निर्धारीत 50 षटकात पाच बाद 405 धावांचा डोंगर रचला. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी भारताने 2004 च्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता.

हरनूर-अंगकृषने युगांडाच्या गोलंदाजांचा घेतला समाचार
युगांडा विरुद्धच्या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाने फलंदाजीचा चांगला सराव करुन घेतला. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हरनूर सिंह आणि अंगकृष रघुवंशीने डावाची सुरुवात केली. संघाच्या 40 धावा झालेल्या असताना हरनूर व्यक्तीगत 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर या सामन्यात कर्णधारपद भूषवणारा निशांत सिंधू सुद्धा 15 धावांवर आऊट झाला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या राज बावा आणि अंगकृषची जोडी जमली. त्यांनी युगांडाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अंगकृषचं मागच्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात शतक हुकलं होतं. पण या सामन्यात त्याने ती कसर भरुन काढली. अंगकृषने 120 चेंडूत 144 धावा केल्या. यात 22 चौकार आणि चार षटकार होते.

युगांडाच्या पाच फलंदाजांनी भोपळाही नाही फोडला
भारताने दिलेल्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा डाव अवघ्या 79 धावात आटोपला. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. दोघांनीच फक्त दोन आकडी धावा केल्या. यात कॅप्टन पास्कलने सर्वाधिक (34) धावा केल्या. फलंदाजीत विशेष चमक न दाखवू शकलेल्या कॅप्टन निशांत सिंधूने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली. अवघ्या 20 षटकात युगांडाचा डाव आटोपला.

ICC U-19 World Cup India won against uganda angkrish raghuwanshi and raj bawa scored record breaking hundred