लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात येत्या 7 जूनपासून फायनलचा सामना रंगणार आहे. दोन्ही टीम्सचे प्लेयर लंडनमध्ये पोहोचले असून त्यांचा जोरदार सराव सुरु आहे. टीम इंडियाच नेतृत्व रोहित शर्माच्या तर ऑस्ट्रेलियाच नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. खेळाडू मैदानात घाम गाळतायत.
त्यांना प्रयत्नात कुठलीही कसूर ठेवायची नाहीय. 10 वर्षानंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याचा कॅप्टन रोहित शर्माचा प्रयत्न आहे. टीम इंडियाने 2013 साली आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी एमएस धोनी टीमच नेतृत्व करत होता.
तर मोठी समस्या होईल दूर
WTC 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज टीम इंडियासमोर अडचण निर्माण करु शकतो. हा दिग्गज दुसरा-तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा टॉप फलंदाज स्टीव्ह स्मिथ आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलय. आता तो पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली टीमला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय गोलंदाजांनी स्मिथला लवकर बाद केलं, तर मोठी समस्या दूर होईल.
भारताविरुद्ध असे आहेत आकडे
स्टीव्ह स्मिथने 2010 साली टेस्ट डेब्यु केला. तो, आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळलाय. 59.80 च्या सरासरीने त्याने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये एकूण 8792 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 30 सेंच्युरी आणि 37 हाफ सेंच्युरी आहेत. भारताविरुद्ध त्याने नेहमी खोऱ्याने धावा केल्या आहेत. स्मिथने टीम इंडिया विरुद्ध 18 टेस्ट मॅचमध्ये 65.06 च्या सरासरीने 1887 धावा केल्या आहेत. यात 8 सेंच्युरी आहेत.
इंग्लंडमध्ये कमालीचा रेकॉर्ड
स्मिथने इंग्लिश भूमीवर भरपूर धावा केल्या आहेत. अजूनपर्यंत इंग्लंडमध्ये कधी स्मिथ भारताविरुद्ध खेळलेला नाही. स्मिथ इंग्लंडमध्ये 16 टेस्ट मॅच खेळलाय. त्याने 59.55 च्या सरासरीने 1727 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये त्याच्या नावावर 6 सेंच्युरी आहेत. त्याने 8 विकेट सुद्धा काढलेत. त्याची बॅट तळपली, तर मोहम्मद शमी असो किंवा सिराज टीम इंडियाच्या अडचणी वाढतील.