लंडन : द केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. या कसोटीत जो संघ जिंकेल, तो नवीन टेस्ट चॅम्पियन असेल. टीम इंडियाला मागच्या 10 वर्षांपासूनचा आयसीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 साली शेवटची आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया WTC फायनल जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.
काल टेस्ट मॅचचा पहिला दिवस झाला. टीम इंडियाने सुरुवात चांगली केली. पहिल्या सत्रात 3 विकेट मिळवले. पण त्यानंतरच्या सर्व सत्रांवर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवल.
रोहित-द्रविड जोडीने असा निर्णय का घेतला?
टीम इंडियाने काल संघ जाहीर करताना अनुभवी रविचंद्रन अश्विनला ड्रॉप केलं. अश्विनसारख्या दिग्गज स्पिनरला वगळल्यामुळे चर्चा होण स्वाभाविक आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेडकोच राहुल द्रविड यांनी पीच आणि परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला, यात अजिबात शंका नाही. इंग्लंडमधल्या कडीशन्स लक्षात घेता, अश्विन टीममध्ये फिट बसत नव्हता. म्हणून त्याला वगळलं.
दिवस पुढे सरकला, तशी चर्चा आणखी वाढली
अश्विनला ड्रॉप केल्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला चर्चा होण अपेक्षित होतं. पण दिवस जस-जसा पुढे सरकत गेला तसतशी ही चर्चा आणखी वाढत गेली. अश्विनला टीममध्ये स्थान न देऊन टीम इंडियाने कशी मोठी चूक केलीय, हेच अनेकजण सांगत आहेत, क्रिकेट पंडितांचे वेगवेगळे अंदाज आहेत. ऑस्ट्रेलियन टीममध्ये पाच लेफ्टी बॅट्समन आहेत, त्यामुळे अश्विन टीममध्ये हवा होता, असा तर्कही मांडला जातोय.
गोलंदाजांनी किती धावा दिल्या?
कालच्या दिवसातला खेळ पाहिला, तर एक गोष्ट लक्षात येते, टीम इंडियाचे अन्य गोलंदाजही फ्लॉप ठरले. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट काढला. पण पहिलं सत्र वगळता हे बॉलर्स फ्लॉपच ठरले.
WTC Final च्या पहिल्या दिवसाच्या खेळात मोहम्मद शमीने 20 ओव्हर्समध्ये 77 धावा देऊन 1 विकेट घेतला. मोहम्मद सिराजने 19 ओव्हर्समध्ये 67 धावा देऊन 1 विकेट काढला. शार्दुल ठाकूरने 18 ओव्हरमध्ये 75 रन्स देऊन 1 विकेट काढला. उमेश यादवने 14 ओव्हर्समध्ये 54 धावा दिल्या. रवींद्र जाडेजाने 14 ओव्हरमध्ये 48 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाला नाही.
तर, अश्विन बद्दल कोणी बोललही नसतं
रविचंद्रन अश्विनला घेऊनही अशीच स्थिती असती? मग काय बोलणार होते? कदाचित अन्य पाच बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवला असता, तर अश्विन बद्दल कोणी बोललही नसतं. एक नाही, तुमचे चार-चार टॉपचे बॉलर्स फेल होतात तेव्हा अशा चर्चेला अर्थ नसतो. रोहित-द्रविड जोडीला एक निर्णय घ्यायचा होता, बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्यांनी अश्विनच्या वर जाडेजाला प्राधान्य दिलं. निर्णय न घेण्यापेक्षा कुठलाही एक निर्णय घेणं केव्हाही चांगलं असतं.