लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडिया सध्या लंडनमध्ये आहे. येत्या 7 जूनपासून द केनिंग्टन ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. दोन्ही टीम्स फायनलसाठी कसून सराव करत आहेत. सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाला काहीही करुन विजय मिळवायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मागच्या 10 वर्षापासूनच आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे.
टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये फायनलसाठी मेहनत करत असले, तरी त्यांनी फॅन्सना निराश केलेलं नाही. टीम इंडिया जेव्हा कधी परदेश दौऱ्यावर जाते, तेव्हा त्यांच्याभोवती फॅन्सचा गोतावळा दिसतो.
पत्रकाराने रोहितला काय विचारलं?
शनिवारी टीम इंडियाची बस लंडनमध्ये पोहोचली, त्यावेळी फॅन्सनी रोहित शर्मासोबत फोटो काढले. WTC फायनल कव्हर करण्यासाठी इंग्लंडला गेलेले पत्रकार विमल कुमार तिथे होते. त्यांनी रोहितला विचारला, मी तुझे, तुझ्या बायकोचे आणि मुलीचे फोटो काढू शकतो का?
यु ट्यूब चॅनलवर ही गोष्ट सांगितली
त्यावर रोहितने त्यांना सभ्यतेने नकार दिला. रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा शर्मा रोहितसोबत लंडनमध्ये आहेत. विमल कुमार यांनी त्यांच्या यु ट्यूब चॅनलवर ही गोष्ट सांगितली.
दोन वर्षात रोहित किती कसोटी सामन्यांना मुकलाय?
भारतीय संघ मागच्या दोन वर्षात एकूण 19 कसोटी सामने खेळलाय. त्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे 8 कसोटी सामन्यांना मुकला आहे. टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वाखाली आशिया कप, त्यानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरली. बांग्लादेशने सुद्धा वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाला नमवलं. या सगळ्याचा रोहितच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
आता पराभव परवडणारा नाही
T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा 10 विकेट राखून पराभव केला होता. आशिया कप, टी 20 वर्ल्ड कपमधील अपयश विसरुन नव्या दमाने मैदानात उतराव लागेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक पराभव झाल्यास, नक्कीच बीसीसीआयचा रोहितवरील विश्वास डळमळीत होईल. त्यामुळे आणखी एक पराभव परवडणारा नाहीय.