लंडन : टीम इंडियाने 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या निमित्ताने टीम इंडियाकडे मागच्या 10 वर्षांपासून असलेला दुष्काळ संपवण्याची चांगली संधी आहे. 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या द ओव्हलवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम किताब जिंकण्याचा प्रयत्न करेल. फायनलमध्ये शुभमन गिल आणि विराट कोहलीला एक शॉट खेळण्याच मोह आवरावा लागेल.
विराट कोहली विद्यमान क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज तर शुभमन गिल भविष्यातील आशास्थान आहे. दोन्ही फलंदाज इंग्लंडमध्ये एक शॉट खेळताना फसू शकतात. त्यावेळी दोन्ही फलंदाजांना खूप काळजीपूर्वक आणि नियंत्रण ठेवून हा शॉट खेळावा लागेल.
कुठल्या शॉटवर आऊट होण्याचा धोका?
गिल आणि कोहली इंग्लंडमध्ये ड्राइव्ह खेळताना फसू शकतात. दोन्ही फलंदाज ड्राइव्हचा फटका चांगला खेळतात, याबद्दल कुठलीही शंका नाही. फ्रंटफूटवर खेळायला दोघांना आवडतं. इंग्लंडमध्ये दोघांनी थोडी काळजी घेतली नाही, तर टीमच्या अडचणी वाढू शकतात. इंग्लंडमध्ये चेंडू जास्त स्विंग होतो, इथे बहुतांश फलंदाज पुढे येणाऱ्या चेंडूवर ड्राइव्ह मारताना स्लिपमध्ये कॅचआऊट होतात. याच कारण आहे स्विंग. चेंडू खूप स्विंग होतो. त्यामुळे फलंदाज लाइनमध्ये खेळू शकत नाहीत आणि बाद होतात.
Get your friends, form a circle and replicate this fun drill! ????#TeamIndia pic.twitter.com/X6iOuXPrhY
— BCCI (@BCCI) May 26, 2023
ऑस्ट्रेलियन बॉलर्स कुठल्या टप्प्यावर बॉलिंग करतील?
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड हे ऑस्ट्रेलियन बॉलर्स ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या लाइनवर चेंडू पुढे टाकून फलंदाजांना आऊट करण्याचा प्रयत्न करतील. कोहली आणि गिल दोघांनाही पुढे चेंडू पाहून ड्राइव्ह मारण्याचा मोह होतो. हे दोघेही ड्राइव्ह मारताना अनेकदा घाई करतात. दूरुनच ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न करतात. इंग्लंडमध्ये ड्राइव्हचा फटका खेळताना जास्त काळजी घ्यावी लागते. कारण स्लीपमध्ये कॅच आऊट होण्याचा धोका जास्त आहे.
कोहली-गिल स्वत:ला रोखू शकतात
ड्राइव्हचा फटका ही कोहली आणि गिलची ताकत आहे. त्यामुळे ड्राइव्हचा फटका बंद करायचा यावर तोडगा असू शकत नाही. चेंडूला जास्त स्विंग होण्यापासून रोखण्यासाठी पुढे खेळणं आवश्यक असतं. त्यामुळे दोघांनी जास्त सावधपणे या शॉटचा वापर करावा. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राइव्ह मारण्यापासून ते स्वत:ला रोखू शकतात.