एडिलेड: टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाने सेमीफायनलचा टप्पा गाठल्याने क्रिकेटप्रेमी आनंदात आहेत. पण त्याचवेळी भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एक समस्येकडे लक्ष वेधलं आहेत. त्यांनी बोलून दाखवलेली भिती प्रत्यक्षात आली, तर काय? असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेट रसिकाच्या मनात निर्माण होऊ शकतो.
गावस्कर काय म्हणाले?
सुनील गावस्करांनी केलेलं हे विधान काय आहे? ते जाणून घेऊया. सूर्यकुमार यादवचा एखादा दिवस खराब असेल, तर टीम इंडियाला 140-150 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. सध्या सूर्यकुमार तुफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे.
सूर्यकुमारने किती धावा केल्या?
पाच सामन्यात सूर्यकुमार यादवने 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. 193.96 चा अविश्वसनीय स्ट्राइक रेट आहे. गावस्करांनी सूर्यकुमारच तोंडभरुन कौतुक केलं. तो नवीन मिस्टर 360 डिग्री असल्याचं गावस्कर म्हणाले.
मिस्टर 360 डिग्री बद्दल गावस्कर म्हणाले….
“त्याची प्रत्येक इनिंग 360 डिग्रीची आहे. तो नवीन मिस्टर 360 डिग्री आहे. तो विकेटकीपरच्या डोक्यावरुन सिक्स मारु शकतो. गोलंदाज ज्या टप्प्यावर, वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो, सूर्यकुमार नेमका त्याचाच फायदा उचलतो. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह मारतो. त्याच्या पुस्तकात प्रत्येक शॉट आहे. स्ट्रेट ड्राइव्ह सुद्धा मारतो” असं गावस्कर म्हणाले.
“तो धावसंख्येला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो की, तुम्हाला टार्गेटचा बचाव करता येईल. त्याच्या नाबाद 61 धावा नसत्या, तर टीम इंडिया 150 पर्यंतही पोहोचली नसती” असं गावस्कर म्हणाले.
….म्हणून राहुलने जास्त धावा करणं गरेजच
“सध्याच्या घडीला सूर्यकुमार आणि कोहली हे दोन फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. केएल राहुलची हाफ सेंच्युरी पाहून बर वा़टलं. पण त्याने त्यापेक्षा जास्त धावा केल्या पाहिजेत. सूर्या चालला नाही, तर टीम इंडियाला 140-150 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे राहुलने अजून जास्त धावा केल्या पाहिजेत” असं गावस्कर म्हणाले.