T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. ग्रुप A मध्ये टीम इंडिया टॉपवर आहे. त्यांनी सलग तीन सामने जिंकून सुपर-8 राऊंडमध्ये प्रवेश केलाय. न्यू यॉर्कची खेळपट्टी कठीण होती. पण टीम विजयाची हॅट्ट्रिक करण्यात यशस्वी ठरली. न्यू यॉर्कमध्ये झालेल्या सामन्यानंतर टीम इंडियासमोर एक मोठा प्रश्न आहे. विराट कोहली ऐवजी यशस्वी जैस्वालला ओपनिंगला पाठवायचा का? हा प्रश्न निर्माण झालाय. कारण मागच्या तीन सामन्यात विराट कोहली ओपनर म्हणून अयशस्वी ठरलाय. फक्त 9 चेंडूत 5 धावा त्याच्या खात्यावर आहेत. विराटला खरच ओपनिंगमधून हटवलं, तर किती नुकसान होईल?.
सर्वात पहिली ही गोष्ट समजून घ्या, विराट कोहलीच्या ओपनिंगवरुन इतका गदारोळ का सुरु आहे? विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा ओपनिंग करतोय. सलग तीन इनिंगमध्ये तो फेल गेलाय. आयर्लंड विरुद्ध त्याने एक रन्स केला. पाकिस्तान विरुद्ध 4 आणि अमेरिके विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. जो विराट कोहली आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत होता, आता त्याच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. त्यामुळे एक्सपर्ट पुन्हा एकदा विराट कोहलीला नंबर 3 वर खेळवण्याचा सल्ला देत आहेत.
ओपनिंग पोजिशनवरुन हटवल्यास नुकसान काय?
आता हे समजून घ्या विराट कोहलीला ओपनिंग पोजिशनवरुन हटवलं, तर काय नुकसान होईल? विराट कोहलीचा बॅटिंग नंबर बदलल्यास मोठी किंमत चुकवावी लागू शकते. आता विराट कोहलीची बॅटिंग पोजिशन बदलल्यास नियमित ओपनर यशस्वी जैस्वालचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा लागेल. अशावेळी शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा यापैकी एकाला बाहेर बसवाव लागेल.
टीममध्ये काय बदलणार?
समजा विराटला ओपनिंग पोजिशनवरुन हटवून नंबर 3 वर खेळवल्यास ऋषभ पंतच काय होईल? विराट ओपनिंग करणार नसेल, तर सध्याची नंबर 3 ची ऋषभची जागा विराटला द्यावी लागेल. अशावेळी ऋषभ पंतला फिनिशरचा रोल निभवावा लागेल. कारण नंबर 4 पोजिशनवर सूर्यकुमार यादवच असेल.
सर्व बॅलन्स कसा बिघडणार?
मधल्या ओव्हर्समध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीला वेग मंदावतो हे त्याला ओपनिंगला पाठवण्यामागच एक कारण आहे. आता विराट पुन्हा नंबर 3 वर आल्यास तो मोठे फटके खेळू शकेल का?. एकूणच विराट कोहलीचा बॅटिंग नंबर बदलल्यास टीम इंडियाचा सर्व बॅलन्स बिघडेल. त्यामुळे विराटला ओपनिंगला खेळवण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावरुन माघार घेण आता कठीण आहे. विराटने आता ओपनर म्हणून चांगलं प्रदर्शन केलं, तर टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा होईल.