मुंबई: नुकत्याच संपलेल्या IPL 2022 च्या सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने त्याला एकाही सामन्यात खेळवलं नाही. त्यामुळे सचिनचे चाहते निराश झाले. त्यांना अर्जुन तेंडुलकरला खेळ पहायचा होता. अर्जुन तेंडुलकरला Mumbai Indians ने मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. संपूर्ण सीजन मुंबईने अर्जुनला बेंचवर बसवून ठेवलं. शौकीन, कुमार कार्तिकेय सारख्या युवा खेळाडूंना संधी मिळाली. पण अर्जुन बेंचवरच बसून होता. अर्जुनला प्लेइंग 11 मध्ये का संधी मिळाली नाही, त्या बद्दल मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बाँड यांनी विस्ताराने सांगितलं. अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी, अर्जुनला त्याच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल, असं शेन बाँड म्हणाले.
अर्जुन तेंडुलकरच्या विषयावर भारताचे माजी कर्णधार आणि लीजेंड कपिल देव यांनी सुद्धा आपलं मत मांडल आहे. “अर्जुनच्या मागे जे आडनाव आहे, त्यामुळे त्याला नेहमीच थोडा जास्त दबाव जाणवेल. सचिन तेंडुलकरने जे मापडंद घालून दिलेत, त्याची बरोबरी करणं, आजच्या काळातल्या कुठल्याही क्रिकेटपटूसाठी सोपं नाहीय” असं कपिल देव म्हणाले. अर्जुनची सचिन बरोबर बरोबरी करु नये, असंही त्यांना वाटतं. अर्जुनच्या वयाचा विचार करता, त्याने खेळाचा आनंद घेतला पाहिजे. त्याला खेळू द्यावं, असं कपिलदेव यांना वाटतं.
“प्रत्येकजण अर्जुन बद्दलच का बोलतो? कारण तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्याला त्याचं क्रिकेट खेळू द्याव, सचिनशी बरोबरी करु नये. तेंडुलकर आडनाव असणं अभिमानास्पद आहे, तसंच त्याचे तोटेही आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्या मुलाने स्वत:च नाव बदलून घेतलं. कारण तो ब्रॅडमन आडनावाचा दबाव झेलू शकत नव्हता” असं कपिल देव म्हणाले.
अर्जुन मागच्या दोन सीजनपासून मुंबई इंडियन्सच्या टीम सोबत आहे. पण त्याने अजून डेब्यु केलेला नाही. मुंबईसाठी फक्त दोन टी 20 सामन्यांमध्ये तो दिसला. भारतीय क्रिकेट संघासाठी अर्जुन तेंडुलकर नेट बॉलर राहिला आहे. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि अन्य स्टार्सनाही गोलंदाजी केलीय. अपेक्षांचा दबाव अर्जुनने घेऊ नये, असं कपिल देव यांचं मत आहे. “अर्जुन निम्मा जरी, त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू बनला, तरी तो स्वत:साठी खूप काही चांगलं करु शकतो” असं कपिल देव म्हणाले
“अर्जुनवर दबाव टाकू नका. तो खूप तरुण आहे. मी त्याला एक गोष्ट सांगेन, मैदानावर जा आणि खेळाचा आनंद घे. तुला काही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही. तू 50 टक्के जरी तुझ्या वडिलांसारखा झालास, तर यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. तेंडुलकर सारखं नाव येतं, तेव्हा आपल्या अपेक्षा वाढतात. कारण सचिन तितका महान होता” असे कपिल देव म्हणाले.