मुंबई : तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानने भारताला चांगलीच झुंज दिली. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण अफगाणी गोलंदाजांनी भारतीय संघाला पहिल्या पाच षटकात बॅकफूटला ढकललं. अवघ्या 22 धावांवर चार गडी बाद झाले होते. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माही एका एका धावेसाठी धडपडत होता.पण रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांच्यात भक्कम भागीदारी झाली. पाचव्या गड्यासाठी 190 धावांची खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 212 धावा करून विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. अफगाणिस्तानने 20 षटकात 6 गडी गमवून बरोबरी साधली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. इथेही सामना टाय झाला आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने आनंद व्यक्त केला. रोहित शर्माने विजयानंतर रिंकू सिंहचं तोंडभरून कौतुक केलं.
” सुपर ओव्हर शेवटची कधी खेळलो होतो ते मला आठवत नाही आयपीएलच्या एका सामन्यात 3 वेळा फलंदाजी केली होती, असं थोडं थोडं लक्षात आहे.” असं उत्तर त्याने सुपर ओव्हरबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलं. त्यानंतर सामन्यात नेमकं काय घडलं? कसा विजयापर्यंत पोहोचलो या प्रश्नाच उत्तर दिलं. ” भागीदारी निर्माण करणे महत्त्वाचे होते.रिंकू आणि मी एकमेकांशी बोलत राहिलो आणि एक भागीदारी झाली. दबाव होता आणि भागीदारी करणे महत्त्वाचे होते”, असं रोहित शर्माने सांगितलं.
“रिंकूने खेळलेल्या शेवटच्या दोन मालिकांमध्ये त्याने बॅटने काय करू शकतो हे दाखवून दिलं आहे. खूप शांतपणे खेळतो आणि त्याची ताकद चांगलीच जबरददस्त आहे. त्याचा अनुभव जबरदस्त आहे आमि त्याच्याकडून जे अपेक्षित आहे ते करत आहे. त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. भविष्यात टीम इंडियासाठी चांगला खेळाडू ठरेल. मधल्या फळीत खरंच अशा खेळाडूची गरज आहे. त्याने आयपीएलमध्ये काय केले हे आम्हाला माहित आहे. आता तो तेच भारतासाठी करत आहे.”, असं रोहित शर्माने रिंकू सिंहचं कौतुक केलं.
टी20 मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून आहे. या मालिकेत जराही गडबड झाली तर अंतिम फेरीचं गणित फिस्कटून जाईल.