मुंबई : बॉर्डर-गावस्कर सीरीज कालच संपली. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला. अहमदाबाद येथे सीरीजमधला शेवटचा सामना खेळला गेला. ही टेस्ट मॅच ड्रॉ झाली. त्याआधी इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. एका कसोटीचा अपवाद वगळता या सीरीजमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. आता सगळ्यांच लक्ष वनडे सीरीजवर लागलं आहे. येत्या 17 मार्चपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना होणार आहे.
पहिल्या वनडे मॅचआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांनी आज अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना 17 मार्चला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं.
वानखेडेची खेळपट्टी कशी असेल ?
कसोटी मालिकेप्रमाणे टीम इंडियाने वनडे सीरीजमध्येही वर्चस्व गाजवावं अशी तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. कसोटी मालिकेत खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. त्यामुळे पहिले तीन कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. आता वनडे मालिकेत खेळपट्टी कशी असेल? याची उत्सुक्ता आहे.
वनडेत हार्दिक पंड्याकडे कॅप्टनशिप
वानखेडेची खेळपट्टी नेहमीच स्पोर्टिंग राहिली आहे. या विकेटवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना समान संधी राहिली आहे. टीम इंडिया वानखेडेवर कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार याची उत्सुक्ता आहे. वनडेमध्ये पहिल्यांदाच हार्दिक पंड्या नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या वनडे सामन्याला उपस्थित नसेल, त्यावेळी नेतृत्वाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर असणार आहे.