IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावात आटोपला. केएल राहुलच्या झुंजार नाबाद 75 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 10.1 ओव्हर्स आणि 5 विकेट राखून आरामात विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने पहिल्या वनडेमध्ये टीमच नेतृत्व केलं. हार्दिकने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेडला बोल्ड केलं. पण त्यानंतर ओपनर मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने डाव सावरला. दोघांनी चांगले फटके मारले.
सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला
अखेर हार्दिक पंड्याने स्टीव्ह स्मिथला बाद करुन ही जोडी फोडली. मिचेल मार्शला रवींद्र जाडेजाने बाद केलं. त्याने 65 चेंडूत 81 धावा केल्या. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीच्या आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतले.
स्टार्कसमोर टीम इंडिया ढेपाळली
टीम इंडियासमोर लक्ष्य छोटं असलं, तरी त्यांना सुरुवातीलाच धक्के बसले. मिचेल स्टार्कने विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवला बाद केलं. मार्कस स्टॉयनिसने ओपनर इशान किशनला आऊट करुन ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात दिली.
हार्दिकने डाव सावरला
टीम इंडियाचा डाव अडचणीत असताना कॅप्टन हार्दिक पंड्याने केएल राहुलसोबत मिळून 44 धावांची महत्वाची भागीदारी केली. हार्दिकने (25), केएल राहुलने नाबाद (75) धावा केल्या. हार्दिक आऊट झाल्यानंतर रवींद्र जाडेजाने राहुलसोबत मिळून नाबाद 108 धावांची भागीदारी करुन टीमचा विजय निश्चित केला. जाडेजाने नाबाद (45) धावा केल्या.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 17, 2023
स्टॉयनिसकडून ओव्हर स्टेपिंग
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने आरामात विजय मिळवला. पण मैदानात काही ड्रामा सुद्धा पहायला मिळाला. स्टार्कच्या धारदार स्पेलनंतर स्टॉयनिस 18 वी ओव्हर टाकत होता. स्टॉयनिसने आक्रमकता दाखवत पंड्याच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरचा चौथा चेंडू टाकताना स्टॉयनिसकडून ओव्हर स्टेपिंग झाली. अंपायरने नो बॉल दिला.
विराट संतापला
हार्दिक पंड्याकडे फ्रि हिटवर मोठा फटका खेळण्याची संधी होती. पण त्याने एक धाव घेतली. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या विराट कोहलीकडे कॅमेरा गेला. विराट हार्दिकने फ्रि हिटचा योग्य वापर केला नाही, म्हणून नाराज दिसला. त्याची Reaction च सर्व काही सांगून गेली. संताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.