IND vs AUS 3rd Test : जाडेजा एक, अश्विन दोन आणि सिराज 4 पावलं दूर, इंदोरमध्ये बनू शकतो महारेकॉर्ड

| Updated on: Mar 01, 2023 | 8:19 AM

IND vs AUS 3rd Test : अश्विन, जाडेजा आणि सिराजने इंदोर कसोटीत आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला, तर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होतील. टीम इंडिया आधीच 4 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे.

IND vs AUS 3rd Test : जाडेजा एक, अश्विन दोन आणि सिराज 4 पावलं दूर, इंदोरमध्ये बनू शकतो महारेकॉर्ड
R jadeja
Follow us on

IND vs AUS 3rd Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरा कसोटी सामना होणार आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर ही टेस्ट मॅच होईल. टीम इंडियाने या सीरीजमध्ये आधीच आघाडी घेतली आहे. टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता इंदोर कसोटी जिंकून टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी आहे. आता इंदोर कसोटीसाठी टीम इंडियाची काय प्लेइंग इलेव्हन असेल, त्या बद्दल टॉसनंतरच माहिती मिळेल.

या टीममध्ये रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजचा समावेश नक्कीच होईल. या तिन्ही खेळाडूंनी या सीरीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलय. खासकरुन जाडेजा आणि अश्विनची गोलंदाजी खेळणं ऑस्ट्रेलियन टीमला झेपत नाहीय. इंदोर टेस्टमध्ये जाडेजा, अश्विन आणि सिराज तिघांकडे एक नवीन रेकॉर्ड रचण्याची चांगली संधी आहे.

पावलांचा अर्थ विकेट होतो

तुम्ही म्हणाल कुठला नवीन रेकॉर्ड? हा तो रेकॉर्ड आहे, ज्यापासून जाडेजा एक पाऊल, अश्विन दोन आणि सिराज चार पावलं दूर आहे. इथे पावलांचा अर्थ विकेट होतो. इंदोर कसोटीत या तिन्ही गोलंदाजांनी कमाल दाखवली, तर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होईल.

जाडेजा कुठला रेकॉर्ड करणार?

इंदोर टेस्टमध्ये रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतला, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल. त्याच्याआधी भारतासाठी अशी कामगिरी कपिलदेव यांनी केली आहे. सध्या जाडेजाच्या नावावर 297 आंतरराष्ट्रीय सामन्यात 499 विकेट्स आहेत. त्याशिवाय फलंदाजी करताना 240 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये 5523 धावा केल्या आहेत.

अश्विनला फक्त 2 विकेट हव्या

इंदोर कसोटीत अश्विनने आणखी 2 विकेट घेतल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाजा बनेल. या बाबतीत तो कपिल देव यांना मागे टाकेल. त्यांच्या नावावर 687 विकेट्स आहेत. अश्विनच्या नावावर सध्या 686 विकेट्स आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी 953 विकेट घेतल्यात. 707 विकेटसह हरभजन दुसऱ्या स्थानावर आहे.

सिराजकडेही संधी

इंदोर कसोटीत मोहम्मद सिराजने अजून 4 विकेट घेतल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 100 विकेट पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो 49 वा भारतीय असेल.