IND vs AUS 3rd ODI : कोणीही विचार केला नव्हता, ते ऑस्ट्रेलियाने करुन दाखवलं. भारताला मायदेशातच वनडे सीरीजमध्ये पराभूत केलं. बुधवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर वनडे सीरीजमधला तिसरा शेवटचा सामना झाला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 21 रन्सनी हरवून सीरीज 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाला विजयासाठी 270 धावांच टार्गेट मिळालं होतं. टीम इंडिया 49.1 ओव्हर्समध्ये 248 धावांवर ऑलआऊट झाली. विराट कोहलीने या मॅचमध्ये सर्वाधिक 54 धावा केल्या. पण कोहलीच्या इनिंगमुळेच टीम इंडियाचा पराभव झाला, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.
कोहली तिसऱ्या वनडे सामन्यात 72 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतकीय इनिंग खेळला. पण कोहलीच्या या इनिंगमुळे टीम इंडिया विजयी होऊ शकली नाही. उलट ते एक पराभवाच कारण ठरलं. या इनिंग दरम्यान कोहलीचा स्ट्राइक रेट फक्त 75 होता. मैदानावर असताना कोहली या इनिंगला वेग देऊ शकला नाही.
कोहलीच्या बाबतीत उलटं घडलं.
टीम इंडियाला ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात दिली. दोघांनी 9 ओव्हर्समध्ये 65 धावा जोडल्या. त्यानंतर 77 रन्सवर टीम इंडियाच्या दोन विकेट गेल्या. टीमचा डाव संभाळण आवश्यक होतं. कोहलीने केएल राहुलसोबत मिळून हेच केलं. कोहली आणि राहुल हळू-हळू डावाला आकार देत होते. 20 व्या ओव्हरच्या अखेरीस कोहलीच्या 29 चेंडूत 29 धावा होत्या. या धावा पाहून कोहली सेट झालाय, असं वाटलं. कोहली आता आपल्या स्टाइलमध्ये चौकार-षटकार ठोकेल असं वाटत होतं. पण उलटं घडलं.
कोहलीची इनिंग जशी पुढे सरकली, तसं धावा आणि चेंडूमध्ये अंतर वाढत गेलं. 36 चेंडूमध्ये कोहली 31 धावांवर होता. 43 चेंडूत 36 आणि 48 चेंडूत त्याच्या 40 धावा झाल्या होत्या. या दरम्यान केएल राहुल आऊट झाला. कोहली अर्धशतकाच्या जवळ होता.
अक्षर पटेलला केलं रनआऊट
कोहली आपल्या अर्धशतकाच्या दिशेने जात होता, तेव्हा तो खूपच डिफेंसिव झाला. सुरुवातीला तो जशी स्ट्राइक रोटेट करत होता, तसं रोटेशन नंतर कमी झालं. याच दरम्यान कोहलीसोबत धाव घेण्याच्या गोंधळामुळे अक्षर पटेल रनआऊट झाला. अक्षर पटेल क्रीजवर टीकला असता, त्याने भागीदारी केली असती, तर ऑस्ट्रेलियावर दबाव वाढला असता. परिणामी निकाल भारताच्या बाजूने लागला असता. कोहलीने 54 धावा करण्यासाठी 72 चेंडू घेतले. त्याने फक्त 2 चौकार आणि एक षटकार लगावला.
बेजबाबदार फटका आणि भारताने गमावली सीरीज
विराट कोहलीने 31 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक रन्स घेऊन अर्धशतक पूर्ण केलं. त्यासाठी त्याने 61 चेंडू घेतले. कोहली टीमला विजय मिळवून देईल असं वाटत होतं. पण हा महान फलंदाज 36 व्या ओव्हरमध्ये एश्टन एगरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डेविड वॉर्नरकडे झेल दिला. कोहली बाद होताच ऑस्ट्रेलियाने मॅचवर पकड मिळवली. त्यानंतर टीम इंडियाला पुनरागमनाची संधीच नाही मिळाली. परिणामी मायदेशात टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज गमवावी लागली.