मुंबई: टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलियाला सहा विकेटने हरवून तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात सूर्यकुमार यादव (36 बॉल 69 रन्स 5 फोर, 5 सिक्स) आणि विराट कोहली (48 बॉल 63 धावा 3 फोर, 4 सिक्स) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्याचवेळी हार्दिक पंड्याने सुद्धा छोटा पण महत्त्वाचा रोल निभावला.
टीम इंडियाचा सर्वोत्तम ऑलराऊंडर
आयपीएलपासून हार्दिक पंड्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सर्वप्रथम त्याने गुजरात टायटन्स सारख्या नवख्या टीमला आयपीएल चॅम्पियन बनवलं. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज, इंग्लंडमधील टी 20, वनडे सीरीज, आशिया कपमध्ये टीमच्या विजयात योगदान दिलं. हार्दिक सध्या टीम इंडियाचा सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे.
महत्त्वाची इनिंग्स खेळलाय
बॅट अणि बॉल दोघांनी तो टीमच्या विजयात योगदान देतोय. बॉलपेक्षा बॅटने तो जास्त चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत तो टीम इंडियासाठी गरज असताना महत्त्वाच्या इनिंग्स खेळलाय. रोहितचा सध्याचा फॉर्मपाहून त्याच्याकडे भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहिलं जातय. काही सीरीजमध्ये त्याने उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळली आहे.
आधीच्या आणि आताच्या हार्दिकमध्ये खूप फरक
हार्दिक पंड्या खेळपट्टीवर आल्यानंतर पाय रोवून उभा राहतो. सहजासहजी विकेट टाकत नाही. परिस्थितीनुसार खेळ करतो. फटकेबाजीची गरज असताना तशी फलंदाजी करतो.
विकेट गेल्या असतील, तर टिकून फलंदाजी करतो. पण धावगती कमी होणार नाही, याची काळजी घेतो. गरजेनुसार तो खेळतो. आधीचा हार्दिक आणि आताचा हार्दिक यात खूप फरक आहे. आधी हार्दिक पंड्या विकेट टाकून जायचा. पण आताचा हार्दिक टीम जिंकेपर्यंत खेळपट्टीवर उभा असतो.
टीमला विजय मिळवून दिला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी 20 सीरीजमध्ये पहिल्या मॅचमध्ये त्याने 30 चेंडूत नाबाद 71 धावा चोपल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार होते. त्यानंतर कालच्या सामन्यात त्याने 16 चेंडू नाबाद 25 धावा फटकावल्या. टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार होता.
लोअर फुलटॉसवर कडक सिक्स
हार्दिकने काल जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर लोअर फुलटॉस चेंडूवर कडक सिक्स मारला. यातून त्याचं कौशल्य दिसून आलं. हार्दिकने मोक्याच्याक्षणी हा सिक्स मारला. हेझलवूड 19 वी ओव्हर टाकत होता. टीम इंडियाला विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. त्यावेळी हेझलवूडच्या पहिल्याच चेंडूवर त्याने सिक्स मारला.