IND vs AUS 4th Test : इंदोर टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची जी हालत झाली होती, त्यावरुन अहमदाबादमध्ये चौथ्या कसोटीत पहिल्यादिवसापासून चेंडू टर्न होणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. काल घडलं सुद्धा असंच. 9 मार्चपासून सुरु झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉ़फीमधील शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी विकेटकडून फलंदाजांना मदत मिळाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमने त्याचा फायदा उचलला. दरम्यान टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस महाम्ब्रे यांनी टीम इंडियाची एक चूक मान्य केलीय.
आज मोठी धावसंख्या उभारण्याची संधी
नागपूर, दिल्ली आणि इंदोरच्या तुलनेत अहमदाबादच्या पीचवर पहिल्या दिवसापासून स्पिनर्सना विशेष मदत मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना फार विकेट मिळाले नाहीत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 255 धावा झाल्या आहेत. ओपनर उस्मान ख्वाजाने शानदार शतक झळकावलं. 104 धावांवर तो नाबाद आहे. त्याशिवाय कॅमरुन ग्रीनने 49 धावांची वेगवान खेळी केली. आज दुसऱ्यादिवशी मोठी धावसंख्या उभारण्याची ऑस्ट्रेलियाकडे संधी आहे.
10 ओव्हरमध्ये काय चूक झाली?
ऑस्ट्रेलियाने काल 250 धावांचा टप्पा ओलांडला. पण टीम इंडियाने त्याने वेगाने धावा बनवू दिल्या नाहीत. रनरेटवर लगाम घातला. 80 व्या ओव्हरनंतर नवीन चेंडू घेणं टीम इंडियाला महाग पडलं. ऑस्ट्रेलियाने त्यावेळी सर्वात जास्त फायदा उचलला. वेगाने धावा बनवल्या. या 10 ओव्हर्समध्ये टीमला धावगतीला लगाम घालता आला नाही, हे कोच पारस महाम्ब्रे यांनी मान्य केलं.
कोच म्हाब्रे काय म्हणाले?
“पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन टीमने चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला आम्ही जास्त धावा दिल्या. पण चेंडू जुना झाल्यानंतर धावा बनवणं कठीण होत गेलं. दुसरं सत्र आमच्यासाठी चांगल ठरलं. आम्ही अखेरच्या 10 ओव्हरमध्ये 56 धावा दिल्या. मला वाटतं याच टप्प्यावर खेळ आमच्या मनासारखा झाला नाही. अंतिम सत्रात आम्ही थोड्या जास्त धावा दिल्या” असे म्हाब्रे म्हणाले.
पेस बॉलर्सच्या रोटेशनवर काय म्हणाले?
या सीरीजमध्ये टीम इंडियाच्या पेस बॉलर्सना रोटेट केलं जातय. त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत. त्यावर कोच पारस महाम्ब्रे म्हणाले की, ‘या निर्णयामुळे भविष्यात वेगवान गोलंदाजांना फायदा होईल’ पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खेळले. तिसऱ्या कसोटीत शमीच्या जागी उमेश यादव आला. शमीला त्या सामन्यात आराम दिला. चौथ्या कसोटीत सिराजच्या जागी शमीला संधी दिली.