IND vs AUS 4th TEST : इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने तब्बल 9 विकेट राखून टीम इंडियावर विजय मिळवला. इतक्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाने इंदोरमध्येच थांबून प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाला दोन मोठे खेळाडू अपवाद आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली. या दोन सुपर स्टार खेळाडूंनी ब्रेक घेतला आहे. ते टीमला अहमदाबादमध्ये जॉइन करतील. बाकी सर्व खेळाडूंचा इंदोरमध्येच हेड कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.
कुठल्या खेळाडूंसोबत द्रविड बोलले?
तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली. पण त्याला फायदा उचलता आला नाही. राहुल द्रविड आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी शुभमनसोबत दीर्घ चर्चा केली. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि केएस भरत फलंदाजीत प्रभावी कामगिरी करु शकलेले नाहीत. त्या दोघांसोबत सुद्धा द्रविड-रोठड यांनी चर्चा केली.
कोणाला संधी? कोणाला विश्रांती?
टीम इंडिया अहमदाबादसाठी सोमवारी रवाना होणार आहे. मंगळवारपासून ते सराव सुरु करतील. चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. त्याला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज लक्षात घेऊन मोहम्मद सिराजला विश्रांती देण्य़ाचा निर्णय होऊ शकतो. फलंदाजीत बदल होण्य़ाची शक्यता कमी आहे. केएल राहुलच्या जागी शुभमन गिलच खेळेल.
केएस भरतच्या स्थानाला धोका नाही
अश्विन आणि जाडेजाच्या तुलनेत अक्षर पटेलने आतापर्यंत तिन्ही कसोटी सामन्यात 39 ओव्हरच बॉलिंग केलीय. पण बॅटने 92.50 चा एव्हरेज लक्षात घेता, तो टीममधील आपलं स्थान कायम टिकवेल. केएस भरत तीन कसोटींमध्ये संधी मिळूनही प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. पण विकेटकीपिंगच कौशल्य लक्षात घेता त्याचं टीममधील स्थान कायम राहील.