IND vs AUS Pitch Report : भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस उरलेत. 9 फेब्रुवारीपासून दोन्ही टीम्समध्ये टेस्ट सीरीज सुरु होईल. नागपूरमध्ये पहिली कसोटी सुरु होण्याआधी मानसिक दबाव टाकण्याचा खेळ आधीच सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियन टीम यामध्ये नेहमी आघाडीवर असते. पण टीम इंडियाने वेळोवेळी त्यांना त्याच तोडीच प्रत्युत्तर दिलय. ऑस्ट्रेलियने टीमने भारतात येण्याआधीच रडीचा डाव सुरु केला होता. त्यांनी भारतीय विकेट्सबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रॅक्टिस मॅचमध्ये बीसीसीआयकडून जी विकेट दिली जाते. प्रत्यक्ष सामन्याच्यावेळी मात्र तशी विकेट नसते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम यावेळी एकही प्रॅक्टिस मॅच खेळली नाही. कारण त्याचा काही उपयोग नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशपिच्या फायनलमध्ये खेळणं टीम इंडियाच लक्ष्य आहे. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका महत्त्वाची आहे.
कशी असेल नागपूरची विकेट?
पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये होणार आहे. तिथली विकेट कशी असेल? याची चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांचा आधीच धसका घेतलाय. नागपूरच्या विकेटबद्दल आता माहिती समोर आली. नागपूरची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असेल. फिरकी गोलंदाजी खेळणं भले, भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक बनलं असेल, पण भारताकडे चांगल्या दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत.
“फिरकी गोलंदाज टीम इंडियाचे बलस्थान आहेत. विकेट काढण्यासाठी फिरकी गोलंदाजांना अनुकूल स्थिती निर्माण करुन दिली पाहिजे” असं टीममधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
टीम इंडियाने काय सांगितलेलं?
नागपूर कसोटीसाठी भारतीय क्रिकेट टीमने फिरकी खेळपट्टीची मागणी केली होती. नागपूरची विकेट सुद्धा तशीच आहे. सोमवारी खेळपट्टी हिरवीगार होती. काही तपकिरी पॅचेस आहेत. खेळपट्टीवरील गवत कापण्यात येईल. कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा एकदा स्पिनर्सवर जास्त अवलंबन असेल.
टीम इंडिया सर्वाधिक कोणावर अवलंबून असेल?
टीम इंडियाकडे सध्या अश्विन, जाडेजा, अक्षर आणि कुलदीप असे चार अव्वल स्पिनर्स आहेत. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हे चारही स्पिनर्स कुठल्याही टीमवर भारी पडू शकतात. त्यामुळे या सीरीजमध्ये भारताचा भर फिरकी खेळपटट्यांवर असेल. मागच्या काही वर्षात मायेदशात झालेल्या 34 कसोटी सामन्यांपैकी भारताने 27 कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. एकही सीरीज गमावलेली नाही.