IND vs AUS Test : उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही टीम्सनी कसून सराव केलाय. ऑस्ट्रेलिया समोर फिरकी गोलंदाजी खेळण्याच चॅलेंज आहे, तर भारतासमोर फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याच आव्हान आहे. फिरकी गोलंदाजी टीम इंडियाच बलस्थान आहे. नागपूरची खेळपट्टी सुद्धा तशीच असणार आहे. टीम मॅनेजमेंटने फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याची सूचना केली होती. टीम इंडियाच्या परफॉर्मन्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी राहुल द्रविड आपल्या बाजूने सर्व काळजी घेतायत. राहुल द्रविड यांनी NCA चे स्पिन बॉलिंग कोच साईराज बहुतुले यांना नागपूरला बोलवून घेतलं.
का बोलावलं?
बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान टीम इंडियाच्या फिरकी बॉलर्सना सहाय्य करण्यासाठी म्हणून साईराज बहुतुले यांना पाचारण करण्यात आलं. टीम इंडियाचा भाग नसलेले अन्य स्पिन गोलंदाजही नागपूरच्या कॅम्पमध्ये दाखल झालेत.
साईराज बहुतुलेंचा परफॉर्मन्स
मागच्यावर्षी भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी साईराज बहुतुले कोचिंग स्टाफचा भाग होते. साईराज बहुतुले भारतासाठी दोन टेस्ट आणि आठ वनडे सामने खेळले आहेत. ते 188 फर्स्ट क्लासचे सामने खेळलेत. त्यात 630 विकेट घेताना 6176 धावा केल्यात.
टीमचा भाग नाही पण हे बॉलर संघासोबतच राहणार
खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असणार आहे. मागच्या काही वर्षात भारताचे टॉप प्लेयर रोहित शर्मा, विराट कोहली, फिरकी गोलंदाजी खेळताना चाचपडताना दिसले आहे. त्यांना अधिक चांगला सराव व्हावा, यासाठी वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर, राहुल चाहर, जयंत यादव आणि पुल्कीत नारंग भारतीय टीमसोबतच राहणार आहेत.
पीचवर नाराजी
टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे नागपूरमध्ये पहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या पीचवर नाराज असल्याची माहिती आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटने पहिल्या कसोटीसाठी तयार केलेल्या खेळपट्टीमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या जामठा स्टेडियममध्ये हा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
टीम इंडियाच बलस्थान
असोशिएशनचे पदाधिकारी आणि क्युरेटर भारतीय टीमच्या मागणीनुसार, पीच बनवून देण्यासाठी दिवस-रात्र काम करतायत. नव्या बदलानुसार, साइट स्क्रीनमध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे. पूर्ण पाच दिवस कसोटी सामना चालेल, अशी खेळपट्टी बनवण्याचा आग्रह आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याची सूचना आहे. स्पिन गोलंदाजी टीम इंडियाच बलस्थान आहे. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असे अव्वल दर्जाचे गोलंदाज टीम इंडियाकडे आहेत.