IND vs AUS Test: टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिका सुरु असली, तरी क्रिकेट चाहत्यांच लक्ष भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेकडे लागले आहे. भारत-ऑस्ट्रेलियामधील टेस्ट सीरीज नेहमीच उत्कंठावर्धक राहिली आहे. मागच्या तीन-चार वर्षात कसोटी मालिकेवर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलय. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सलग तीन कसोटी मालिका गमावल्या आहेत. यावेळी हे चित्र बदलण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येईल. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरमधून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतातील कसोटी मालिका किती कठीण आहे, याची ऑस्ट्रेलियन टीमला चांगली कल्पना आहे. भारतातील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल असतात. त्यामुळे या स्पिनिंग ट्रॅकवर ऑस्ट्रेलियन टीमला सरस खेळ दाखवावा लागेल.
ऑस्ट्रेलियन टीमसमोर एव्हरेस्ट सारख चॅलेंज
भारतीय टीम ऑस्ट्रेलियात जाते, त्यावेळी वेगवान खेळपट्ट्यांच आव्हान असतं. तसंच ऑस्ट्रेलियन टीम भारतात येते, तेव्हा फिरकी खेळपटट्यांच त्यांच्यासमोर चॅलेंज असतं. ऑस्ट्रेलियन टीमला त्यांच्यासमोर एव्हरेस्ट सारख चॅलेंज असल्याची कल्पना आहे. ऑस्ट्रेलियाला प्रामुख्याने आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीची प्रामुख्याने धास्ती आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरु केलीय.
कुठे सुरु आहे सराव?
भारतात फिरकीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सिडनीत विशेष खेळपट्टया तयार केल्या आहेत. त्यावर त्यांचा सराव सुरु आहे. उत्तर सिडनीमधील बॉन अँड्रयूज ओव्हलवर ऑस्ट्रेलियन टीम सराव करतेय. मंगळवारी ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यासाठी रवाना होईल. त्याआधी काही निवडक प्लेयर इथे सराव करतायत.
ग्राऊंड स्टाफच उत्तम काम
“आम्हाला जशी विकेट हवी होती, तशीच विकेट कायरनने ग्राऊंडस्टाफच्या मदतीने तयार केलीय. त्याने खूप सुंदर काम केलय. भारतात आम्हाला जशा विकेट मिळणार आहेत, ही तशीच विकेट आहे. भारतात असते, तशीच विकेट इथे तयार करणं कठीण आहे. पण मिळती-जुळती विकेट तयार केलीय. ग्राऊंड स्टाफने उत्तम काम केलय” असं ऑस्ट्रेलियन कोच अँड्रयू मॅकडोनल्ड इएसीएल क्रिकइन्फोला म्हणाले.
मायदेशात भारत कधीपासून अजिंक्य?
भारतात विकेट्सवर तडे गेलेले दिसतात. टेस्टसाठी भारतात SG चा बॉल वापरला जातो. ऑस्ट्रेलियाला जास्त भिती अश्विन आणि अक्षर पटेलची आहे. 2012 पासून टीम इंडियाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.