टीम इंडियाने बांगलादेशवर पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 280 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान गिलं होतं. मात्र भारताने बांगलादेशचा 234 धावांवर करेक्ट कार्यक्रम केला. भारताला या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये चांगला फायदा झाला आहे. तर पराभवामुळे बांगलादेशला फटका बसला आहे. बांगलादेशची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. तर टीम इंडियाने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे.
पॉइंट्स टेबलच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताची विजयी टक्केवारी ही 71.66 इतकी झाली आहे. भारताच्या खात्यात 10 कसोटीत 86 गुण आहेत. तर बांगलादेशला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. बांगलादेशची चौथ्यावरुन सहाव्या स्थानी घसरली आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 45.83 वरुन 39.28 अशी झाली आहे. तर श्रीलंका आणि इंग्लंडला 1-1 स्थानाने फायदा झाला आहे.
भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. विजयी टक्केवारी 60 पेक्षा अधिक असल्यास अंतिम फेरीत पोहचण्याची संधी अधिक असते. टीम इंडिया 2023 साली 58.8 टक्क्यांसह पात्र ठरली होती. टीम इंडियाला अद्याप 2023-2025 या साखळीतील 9 सामने खेळायचे आहेत. त्या 9 पैकी भारताला 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर त्यांनतर रोहितसेना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.