Ind vs Ban 1st Test : वनडे सामना गमवल्यानंतर आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्याआधीच संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.तर चेतेश्वर पुजारा संघाचा उपकर्णधार असेल. रोहितला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती . त्यामुळेच तो तिसऱ्या वनडे सामन्यात ही खेळू शकला नव्हता. उपचारासाठी तो मुंबईला रवाना झाला. मालिकेतील पहिला सामना 14 ते 18 डिसेंबर आणि दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून सांगितले की, तज्ज्ञांनी रोहितला विश्रांतीचा सल्ला दिल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. तर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल. वरिष्ठ निवड समितीने पहिल्या कसोटीसाठी त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश केला आहे.
केवळ रोहितच नाही तर भारताचे आणखी दोन दिग्गज खेळाडूही बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळणार नाहीत.मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत आणि त्यामुळेच ते सध्याच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाहीत. “वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप त्यांच्या खांद्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि ते कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत,” असे बीसीसीआयने म्हटले आहे.
या दोघांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सांगितले की, “निवडकर्त्यांनी शमी आणि जडेजाच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश केला आहे. निवड समितीने जयदेव उनडकटचाही कसोटी मालिकेसाठी संघात समावेश केला आहे.
भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनडकट.