टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना हा 27 सप्टेंबरपासून होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. मात्र अद्याप बीसीसीआय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केलेली नाही. तसेच बांगलादेशनेही अद्याप संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने येत्या काही दिवसात भारतीय संघाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियात या मालिकेसाठी फेरबदल पाहायला मिळू शकतात.
टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. त्यामुळे बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ऋषभ पंतला विश्रांती दिल्यास विकेटकीपरच्या जागेसाठी चुरस पाहायला मिळू शकते. पंतच्या जागेसाठी संजू सॅमसन निवड समितीची पहिली पसंद असू शकते. तसेच दुसरा विकेटकीपर म्हणून जीतेश शर्मा आणि ईशान किशन या दोघांमधून एकाची निवड केली जाऊ शकते.
ईशान किशन याची इराणी ट्रॉफी स्पर्धेत निवड केली गेली आहे. त्यामुळे ईशानच्या निवडीबाबतही साशंकता आहे. तसेच इराणी ट्रॉफी खेळणार असल्याने काही खेळाडूंना या टी 20I मालिकेत संधी मिळणार असल्याचं स्पष्ट आहे.
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याचं बांगलदेशविरुद्ध टी 20I मालिकेतून कमबॅक होऊ शकतं. अभिषेकची श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I मालिकेत निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे अभिषेकला बांगलादेशविरुद्ध संधी मिळू शकते. तसेच शुबमन, यशस्वी या दोघांना या मालिकेसाठी विश्रांती दिल्यास अभिषेकसह ओपनिंग कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इराणी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. तर 6 ऑक्टोबरपासून ही मालिका होणार आहे. त्यामुळे ऋतुराज संपूर्ण मालिकेत किंवा किमान पहिला सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. अशात ओपनिंग जोडी कोण असणार? याबाबतही अद्याप प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने संघ जाहीर केल्यानंतरच सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. त्यामुळे तोवर क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.