ढाका: वनडे सीरीजनंतर टीम इंडिया आता बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या सीरीजआधी टीम इंडियात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऋषभ पंत सध्या फॉर्ममध्ये नाहीय. बांग्लादेश विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पण उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली नाही. या सीरीजमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळत नाहीय. त्याच्याजागी केएल राहुलकडे कॅप्टनशिपची जबाबदारी आहे. पण उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभऐवजी चेतेश्वर पुजाराकडे देण्यात आलीय. या निर्णयाच अनेकांना आश्चर्य वाटतय.
केएल राहुल स्पष्टच बोलला….
केएल राहुलला आज पत्रकार परिषदेत याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने आपलं रोखठोक मत मांडलं. “उपकर्णधार निवडीचे निकष मला माहित नाही. जेव्हा कोणाची निवड होते, तेव्हा तुम्ही त्याच्या पाठिवर शाबासकीची थाप मारता. ज्यावेळी माझी उपकर्णधारपदी निवड झाली, तेव्हा आनंदी होतो. तुमच्यावर संघाची जबाबदारी असते. त्यात फार काही बदल होत नाही. प्रत्येकाला त्याची भूमिका आणि जबाबदारी माहित आहे. ऋषभ आणि पुजी दोघेही आमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्यांनी अनेकदा त्यांचं काम चोख बजावलं आहे. आम्ही याबद्दल फार विचार करत नाही. आम्ही टीम म्हणून पुढे जातो” असं केएल राहुल म्हणाला.
आता अचानक केला बदल
मागच्या 12 महिन्यात बीसीसीआने कर्णधार आणि उपकर्णधारपदावर अनेक बदल केलेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनी कसोटीत नेतृत्व केलय. बुमराह कसोटीत नेतृत्व करत असताना, पंत उपकर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेत पंत उपकर्णधार होता. आता अचानक पंतच्या जागी पुजाराला उपकर्णधार बनवण्यात आलय.