मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये कालपासून वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली. ओव्हलवर (Oval Odi) पहिला सामना झाला. भारताने या मॅच मध्ये इंग्लंड वर 10 विकेट राखून मोठा विजय मिळवला. भारताने या सामन्यात फक्त इंग्लंडलाच हरवलं नाही, तर त्यासोबत पाकिस्तानचही मोठं नुकसान केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं शक्य आहे?. सामना भारत-इंग्लंड मधला आणि नुकसान पाकिस्तानचं कसं?. हा विषय ICC च्या वनडे रँकिंगशी संबंधित आहे. टीम इंडियाने ओव्हलवर जो विजय मिळवला, त्याचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंग मध्ये दिसला. ओव्हल वर पहिला वनडे सामना होण्याआधी आयसीसी वनडे रँकिंग मध्ये टीम इंडिया पाकिस्तानच्या मागे होती. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या आणि भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता. इंग्लंडचा संघ दुसऱ्या आणि न्यूझीलंडची टीम अव्वल पहिल्या स्थानावर होती. ओव्हलवर झालेल्या सामन्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या स्थानात फरक पडला नाही. ते पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. पण भारत-पाकिस्तानच्या क्रमवारीत बदल झाला.
ओव्हल वनडेत 10 विकेटने मिळवलेल्या विजायाचा परिणाम भारताच्या रँकिंग मध्ये दिसला. पाकिस्तानला हटवून भारतीय संघ आता तिसऱ्या स्थानी विराजमान झालाय. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. भारताचे रेटिंग पॉइंट 108 तर पाकिस्तानचे 106 आहेत. न्यूझीलंड 126 पॉइंटसह टॉपवर तर इंग्लंड 122 अंकांसह दुसऱ्या नंबरवर आहे.
A big change on the latest @MRFWorldwide ICC ODI Team Rankings ?#ENGvINDhttps://t.co/H3XUOTyRe5
— ICC (@ICC) July 13, 2022
इंग्लंड विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीज मध्ये भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. पुढच्या दोन सामन्यांच्या निकालावर रँकिंग मध्ये काय फरक पडू शकतो? भारताने मालिकेत क्लीन स्वीप केलं. 3-0 ने ही मालिका जिंकली, तर भारताचे एकूण 113 रेटिंग पॉइंट होतील. म्हणजे भारत पाकिस्तानपेक्षा आणखी पुढे निघून जाईल. पण भारताला पहिला किंवा दुसरा नंबर मिळणार नाही. कारण इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या टीम भारतापेक्षा बऱ्याच पुढे आहेत. इंग्लंडने पुढचे दोन्ही सामने गमावले, तर त्यांच्या रेटिंग मध्ये घट होऊन 117 पॉइंट होतील. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली, तरी ते पाकिस्तानच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर राहतील. पण भारताचे रेटिंग पॉइंट त्यावेळी 109 असतील.