मुंबई: भारताने वनडे सीरीजची (ODI Series) दमदार सुरुवात केली आहे. टी 20 प्रमाणे इथे सुद्धा भारताने पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. कालचा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. इंग्लंडला कुठेच डोक वर काढता आलं नाही. भारताने इंग्लंड (IND vs ENG) वर तब्बल 10 गडी राखून विजय मिळवला. कदाचित इंग्लंडने सुद्धा इतक्या मोठ्या पराभवाची कल्पना केली नसेल. इंग्लंडचा डाव अवघ्या 26 षटकात 110 धावात आटोपला. याच सर्वाधिक श्रेय जसप्रीत बुमराहच (Jasprit bumrah) आहे. 7.2 षटकात 3 निर्धाव 19 धावा 6 विकेट असं बुमहारच्या गोलंदाजीच पृथक्करण होतं. त्याच बरोबर रोहित शर्मा सुद्धा सॉलिड खेळला. त्याने 58 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार होते. जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांच्याप्रमाणे टीम इंडियातील आणखी एका खेळाडूने दमदार परफॉर्मन्स दिला. त्याचं नाव आहे ऋषभ पंत.
ऋषभ पंतने काल यष्ठीपाठी जी कामगिरी केली, त्याच करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्याने सूर मारुन एकापेक्षा एक सरस कॅच लपकल्या. क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. काल ऋषभ बिलकुल तसाच खेळला. कालच्या सामन्यात ऋषभने यष्ठीपाठी एकूण तीन झेल घेतले. बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांच्या वन हँडेड एका हाताने सूर मारुन त्याने झेल टिपले.
इंग्लंडच्या डावात तिसऱ्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना ऋषभ पंतने सर्वोत्तम यष्टीरक्षणाचं कौशल्य दाखवलं. मोहम्मद शमीने एक जबरदस्त चेंडू टाकला. बेन स्टोक्सने तो बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. तितक्या चेंडूने बॅटची कड घेतली. विकेटकिपिंग करणाऱ्या ऋषभपने उजव्या बाजूला सूर मारुन एकाहाताने तो उत्तम झेल घेतला. त्यानंतर पुन्हा बुमराहच्या गोलंदाजीवर चेंडूने जॉनी बेयरस्टोच्या बॅटची कड घेतली, तेव्हा सुद्धा ऋषभने सूर मारुन शानदार झेल घेतला. याआधी एजबॅस्टन कसोटीत ऋषभ पंतने पहिल्या डावात 146 आणि दुसऱ्याडावात 57 धावांची खेळी केली होती.