मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आजपासून ओव्हल येथे तीन वनडे सामन्यांच्या सीरीजला सुरुवात होणार आहे. भारताने टी 20 मालिकेवर वर्चस्व गाजवलं. भारताने ही सीरीज 2-1 अशी जिंकली. भारताने पहिले दोन्ही टी 20 सामने एकतर्फी जिंकले. पण तिसऱ्या सामन्यात 17 धावांनी पराभव झाला. तिसरा सामना भारताने गमावला, पण शेवटपर्यंत हार मानली नाही. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या लढतीत जबरदस्त खेळ दाखवला. त्याने 55 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी साकारली. इंग्लंडकडून डेविड मलानने (David malan) सर्वाधिक 77 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात आपलं पहिलं शतक झळकावलं. आजच्या सामन्यात त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. टी 20 सीरीजच्या तिन्ही सामन्यांमध्ये संपूर्ण 20 षटकांचा खेळ झाला. पावसाने कुठेही व्यत्यय आणला नाही. वातावरण अनुकूल होते. तेच टेस्ट सामना सुरु असताना, पावसामुळे व्यत्यय आला होता.
ओव्हलचं मैदान दक्षिण लंडन मध्ये आहे. तिथे सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असतात. आज भारत आणि इंग्लंड मध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल का? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. जाणून घेऊया, आजच्या सामन्याआधी हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे.
लंडनच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे. दिवसा आणि रात्रीच्यावेळी फक्त 1 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याचाच अर्थ क्रिकेट चाहत्यांना भारत-इंग्लंड मधील पहिल्या वनडे सामन्याचा पुरेपूर आनंद लुटता येईल. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर कुठल्याही अडथळ्याविना सामना पार पडेल. ग्रोईनच्या दुखापतीमुळे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली पहिल्या वनडेला मुकण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल