मुंबई: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात (India England Tour) दमदार कामगिरी करतोय. या दौऱ्यात टीम इंडियाच्या विजयाइतकीच विराट कोहलीची सुद्धा चर्चा आहे. विराट कोहली (Virat kohli) हा टीम इंडियाचा अव्वल फलंदाज आहे. भारतीय क्रिकेट मध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलय. अनेक सामने एकट्या विराटने जिंकून दिलेत. पण सध्या याच विराट कोहलीचा खराब काळ सुरु आहे. फॉर्म मध्ये परतण्यासाठी त्याची झुंज सुरु आहे. प्रत्येक सामन्याआधी विराट कोहलीला आज सूर गवसणार, अशी चर्चा होते. पण प्रत्यक्षात असं घडत नाही. इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) टी 20 सीरीजच्या शेवटच्या दोन सामन्यात इन फॉर्म खेळाडूला बाहेर बसवून विराटला संधी दिली. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे विराट कोहलीला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
टी 20 सीरीज नंतर इंग्लंड विरुद्ध आता वनडे मालिका सुरु आहे. वनडे सीरीज मधील पहिल्या सामन्यात विराट खेळला नाही. त्याचं कारण होतं, ग्रोइनची दुखापत. उद्या इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. त्यातही विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहली न खेळताही भारताने पहिला सामना सहज जिंकला. उद्या विराटच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यातही विराटच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. पण त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. कारण काल रोहित-शिखर जोडीने नाबाद राहून विजयी लक्ष्य गाठले.
विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला सूर गवसणं आवश्यक आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी त्याला विश्रांती दिलीय. विडिंज विरुद्धच पाच टी 20 सामन्यांसाठी अजून संघ निवड झालेली नाही. या मालिकेसाठी विराट कोहलीला संघातून वगळलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे. कारण निवड समितीच्या सदस्यांनी आधी तसेच संकेत दिले होते. म्हणून इंग्लंड विरुद्धचे दोन टी 20 सामने विराटसाठी महत्त्वाचे होते.
विराट कोहली मोठा खेळाडू आहे. त्याच्यावरुन सध्या भारतीय क्रिकेट मध्ये माजी क्रिकेटपटूंमध्ये सामना रंगला आहे. एक गट विराटला संघाबाहेर करण्याची मागणी करतोय. त्याचवेळी सुनील गावस्कर यांनी विराटचं समर्थन केलय. विराट फॉर्म मध्ये येईल. टी 20 वर्ल्ड कप आधी त्याला भरपूर संधी मिळतील, असं सुनील गावस्कर म्हणाले.