मुंबई: इंग्लंड दौऱ्यावर दाखल झालेल्या (India England Tour) टीम इंडियाचा सध्या सराव सामना सुरु आहे. 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होईल. त्यानंतर टीम इंडिया टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. भारतासाठी एक दिलासा देणारी बाब आहे. इंग्लंडचा स्टार लेगस्पिनर आदिल रशीद (Adil rashid) टी 20 आणि वनडे सीरीजमध्ये इंग्लंडकडून खेळणार नाहीय. रशीद टी 20 ब्लास्ट स्पर्धेत यॉर्कशायरकडून खेळत होता. पण आता त्याला ECB आणि यॉर्कशायर दोघांकडून सुट्टी मिळाली आहे. हज यात्रेला जाण्यासाठी आदिल रशीदने ही सुट्टी मागितली होती.
आदिल रशीद शनिवारी मक्कासाठी रवाना होईल. पुढच्या महिन्यात जुलै मध्ये तो इंग्लंडमध्ये परतण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रशीद उपलब्ध असेल, अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला अपेक्षा आहे. “मला मक्का येथे जायचं होतं. पण वेळ मिळत नव्हता. यावर्षी इथे गेलच पाहिजे अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली” असं राशीदने इएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना सांगितलं.
मी इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि यॉर्कशायरशी बोललो. त्यांनी माझी बाजू समजून घेतली व मला साथ दिली. त्यांनी मला सांगितलं की, “तू जाऊ शकतोस आणि जेव्हा तुझी इच्छा असेल, तेव्हा परत येऊ शकतोस. मी आणि माझी पत्नी काही आठवड्यांसाठी बाहेर जाणार आहोत” असं रशीद म्हणाला. “आमच्यासाठी हा मोठा क्षण आहे. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या गोष्टी असतात. हज यात्रा ही इस्लाम मध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. भारताविरुद्ध मालिका खेळायचीय, हे माझ्या डोक्यात आलं नाही. मला जायचय बसं, एवढाच विचार मी केला” असं रशीदने सांगितलं.
राशीदने कॅप्टन इयन मॉर्गनला टीम मध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचं श्रेय दिलं. “ड्रेसिंग रुममध्ये आमच्या धर्माचा आदर केला जातो. मी आणि मोइन असल्यामुळे इंग्लिश खेळाडू बऱ्यापैकी काही गोष्टी समजल्या आहेत. आम्ही बाहेर जे आहोत, ड्रेसिंग रुममध्ये सुद्धा तसेच असतो. याच श्रेय इंग्लंडला जातं. आमची वेगळी पार्श्वभूमी आहे. आम्ही वेगळ्या देशातून आहोत. आमची टीम वेगळी आहे. पण सगळेच परस्परांचा आदर करतात” असं आदिल रशीद म्हणाला.