IND vs ENG : इंग्लंडला पराभूत करण्यात या खेळाडूचा मोठा हात, चौथ्या-सहाव्या-आठव्या षटकात डाव साधला

| Updated on: Jun 28, 2024 | 2:03 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर भारताने एन्ट्री मारली आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताच्या वाटेला फलंदाजी आली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या. मात्र इंग्लंडचा संघ 103 धावाच करू शकला. या सामन्यात खऱ्या अर्थाने बापूगिरी चालली.

IND vs ENG : इंग्लंडला पराभूत करण्यात या खेळाडूचा मोठा हात, चौथ्या-सहाव्या-आठव्या षटकात डाव साधला
Image Credit source: BCCI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत समोर इंग्लंडचा संघ असल्याने क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. कारण 2022 वर्ल्डकपच्या त्या आठवणींनी कासावीस व्हायला होत होतं. कारण इंग्लंडने तेव्हा भारताचा 10 गडी राखून पराभव केला. मात्र आता भारताने या पराभवाची परतफेड केली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल गमवला तरी रोहित शर्माच्या मनासारखं झालं. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडचा संघ 16.4 षटकात सर्वबाद 103 धावा करू शकला. भारताने हा सामना 68 धावांनी जिंकला. या विजयात सर्वात मोलाची साथ लाभली ती अक्षर पटेलची..भारतीय क्रिकेट संघात बापू नावाने अक्षरची ओळख आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खऱ्या अर्थाने बापुगिरी चालली. पहिल्या तीन षटकात इंग्लंडचे खेळाडू हावी होताना दिसत होते. मात्र चौथं षटक हाती घेतलं आणि पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने कमाल केली.

अक्षर पटेलने घातक अशा जोस बटलरला बाद केलं आणि टीम इंडिया विजयाच्या ट्रॅकवर आली. जोस बटलर 15 चेंडूत 23 धावा करून खेळत होता. त्यामुळे त्याची विकेट खूपच महत्त्वाची होती. त्यानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा सहावं षटक त्याच्याकडे सोपवलं. मग काय पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोच्या दांड्या उडवल्या आणि त्याला खातंही खोलू दिलं नाही. संघाचं आठवं आणि वैयक्तिक तिसरं टाकण्यासाठी अक्षर पटेल आला. त्याने पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला चालता केला. पंतने विकेटच्या मागे कोणतीच चूक न करता स्टंपिंग केलं. अक्षर पटेलने 4 षटकात 23 धावा देत 3 महत्त्वाचे गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

अक्षर पटेलने फलंदाजीतही कमाल केली. डेथ ओव्हरमध्ये एक षटकार मारला आणि संघाची धावसंख्या 170 वर पोहोचवली. त्याचा हा षटकारही मोक्याच्या क्षणी आला होता. या सामन्यानंतर अक्षर पटेलने आपल्या मनातलं सांगितलं. “मी यापूर्वी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली आहे, त्यामुळे मला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करावी लागणार ही योजना होती. विकेटवर थांबत चेंडू जात होता. त्यामुळे योग्य भागात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. विकेट संथ होती, त्यामुळे मी या सामन्यात हळू गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, तो माझ्यासाठी कामी आला. मी वेगवान गोलंदाजी केली असती तर चालले नसते.”, असं अक्षर पटेलने सांगितलं.