मुंबई: भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. सध्या भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे शेवटचा कसोटी सामना (Test Match) रद्द झाला होता. तो कसोटी सामना आता खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या पाचव्या कसोटीआधी इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) भारतीय संघाला इशारा दिला आहे. एजबॅस्टनमध्ये भारतीय संघ एका वेगळ्या इंग्लंडचा सामना करेल, असं स्टोक्सने म्हटलं आहे. इंग्लंडच्या फलंदाजीत तुम्हाला आक्रमकता दिसेल, असं स्टोक्सने सांगितलं. नुकत्यात संपलेल्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडला 3-0 अशी धुळ चारली.
“मी जेव्हा हे म्हणतोय, त्यावर विश्वास ठेवा. प्रतिस्पर्धी संघ दुसरा असला, तरी आम्ही त्याचा मानसिकतेने खेळणार आहोत. भारतीय टीमला एक वेगळा इंग्लिश संघ दिसेल” असं बेन स्टोक्स, हेडिंग्ल येथे न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात केल्यानंतर म्हणाला. “समोर कुठलाही प्रतिस्पर्धी संघ असो, आम्ही त्यांना नमवणारच” असा निर्धार स्टोक्सने बोलून दाखवला. “मी जेव्हा इंग्लंडची कॅप्टनशिप स्वीकारली, त्यावेळी निकालापेक्षा कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आम्ही हे सर्व वेगान करुन दाखवलं, हे अविश्वसनीय आहे” असं स्टोक्स म्हणाला.
“तिसऱ्या कसोटीत 55/6 अशी आमची स्थिती होती. तिथून आम्ही ज्या पद्धतीने डाव सावरला. खेळ दाखवला, ती सीरीजमधली सर्वात समाधानाची बाब आहे” असं स्टोक्स म्हणाला. इंग्लंडचे नवीन कोच ब्रँडन मॅक्कलम यांचही स्टोक्सने कौतुक केलं.
इंग्लंड कसोटी संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रोली, बेन फॉक्स, जॅक लीच, अॅलेक्स ली, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, ऑली पोप
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मयंक अग्रवाल.