एडिलेड: आज एडिलेड ओव्हलवर टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही टीम आज विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. टीम इंडिया मागच्या 15 वर्षांपासून T20 वर्ल्ड कप विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मेलबर्नच तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियासाठी चांगली बातमी
आजच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला चांगली आणि इंग्लंडला एक वाईट बातमी मिळू शकते. सेमीफायनलआधी इंग्लंडला मोठा झटका बसू शकतो. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वुड सेमीफायनलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याला स्नायूंची दुखापत झाली आहे. वुडच्या खेळण्याविषयी साशंकता आहे.
….तेव्हाच सुरु झालेली चर्चा
मार्क वुडच्या जागी ख्रिस जॉर्डनला टीममध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. तो वेगवान गोलंदाजीचा भार संभाळेल. आगामी पाकिस्तानचा दौरा लक्षात घेऊन इंग्लंड टीम मॅनेजमेंट मार्क वुडबाबत कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीय. स्नायूंच्या दुखापतीमुळे मार्क वुड प्रॅक्टिस सोडून गेला होता. त्याचवेळी त्याच्या दुखापतीची चर्चा सुरु झाली होती.
….म्हणून फिल सॉल्ट अतिरिक्त सराव
इंग्लंडचा प्रमुख फलंदाज डेविड मलानलाही ग्रोइनची दुखापत झालीय. तो फिटनेस मिळवण्यासाठी मैदानात मेहनत घेतोय. आज सकाळी त्याची फिटनेस टेस्ट होईल, त्यानंतरच तो खेळणार की, नाही ते स्पष्ट होईल. प्रॅक्टिस सेशनमध्ये बुधवारी फिल सॉल्ट अतिरिक्त सराव देण्यात आला. मलान खेळणार नसेल, तर त्याच्याजागी सॉल्टला उतरवलं जाईल. एलेक्स हेल्सच्या जागी तो सलामीला येऊ शकतो.
“रिकव्हर होण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण वेळ देऊ. आज वूड आणि मलान यांची पुन्हा फिटनेस टेस्ट होईल. त्यात काय ते समजेल. त्यानुसार त्यांच्या टीममधील समावेशाचा निर्णय घेतला जाईल” असं इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर म्हणाला.