IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल दुसऱ्या दिवसअखेर 45 षटकांमध्ये 3 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आजचा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रामुख्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाजवला. इंग्लंडने आज दिवसअखेर सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.