एडिलेड: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचआधी दुखापती टीम इंडियाच्या चिंता वाढवत आहेत. काल नेट्समध्ये थ्रो डाऊनवर सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. आज विराट कोहलीला दुखापत झाली. एडिलेड येथे सराव करताना विराट कोहलीला हर्षल पटेलचा चेंडू लागला. हर्षलने टाकलेला चेंडू विराटच्या अंगठ्याला लागला. विराट दुखापतीमुळे विव्हळत होता. त्याला वेदना झाल्या. त्यामुळे एकक्षणासाठी नेट्समध्ये असलेल्या सर्वांच्याच काळाजाचा ठोका चुकला.
बॉल बसल्यानंतर विराट नेट्समधून बाहेर पडला. पण काही वेळाने त्याने पुन्हा सराव सुरु केला. विराटला झालेली दुखापत गंभीर नाहीय, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाहीय.
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
चालू वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याला होणारी दुखापत परवडणारी नाहीय. आतापर्यंत पाच सामन्यात त्याने 246 धावा केल्या आहेत. यात तीन हाफ सेंच्युरी आहेत. या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 82 धावा फटकावून विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एडिलेडवर कोहलीची नेहमीच स्पेशल कामगिरी
भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल मॅच एडिलेडमध्ये होतेय. ती भारताच्या दृष्टीने चांगली बाब आहे. कारण एडिलेडच्या मैदानात विराट कोहलीने नेहमीच आपला सर्वोत्तम खेळ केला आहे. विराटने या मैदानात सर्वच फॉर्मेटमध्ये 10 सामन्यात 937 धावा केल्या आहेत. यात टेस्ट आणि वनडेमध्ये 5 सेंच्युरी आहेत. दोन टी 20 सामन्यात कोहलीने एडिलेडमध्ये 90 आणि 64 धावा केल्या आहेत.