मुंबई: एजबॅस्टनच्या मैदानावर जेव्हा आज भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध (Ind vs Eng) पाचवी कसोटी खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा सर्वांच लक्ष विराट कोहलीवर असेल. विराट कोहली (Virat kohli) मागच्या दोन वर्षांपासून शतकसाठी झगडतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विराटचा सध्या बॅड पॅच सुरु आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो? याकडे सगळ्याच क्रिकेट चाहत्यांच लक्ष असेल. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) आणि उपकर्णधार केएल राहुल या कसोटीत खेळत नाहीयत. त्यामुळे विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असेल. मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेतील हा सामना आहे. त्यावेळी कोविड मुळे कसोटी सामना रद्द झाला होता. भारतीय संघ या मालिकेत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे 15 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
एजबॅस्टनच्या मैदानावर भारताची कामगिरी अजिबात चांगली नाहीय. सात पैकी सहा कसोटी सामने भारताने गमावलेत. याआधी 2018 साली भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली येथे कसोटी सामना खेळला होता. विराट कोहलीने दोन्ही डावात जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावलं होतं. पण भारताचा अवघ्या 31 धावांनी पराभव झाला होता.
आता केएल राहुल आणि रोहित शर्मा हे दोन मुख्य फलंदाज संघात नाहीयत. कोहलीवर जास्त जबाबदारी आहे. विराटला सुद्धा स्वत:चा शतकांचा दुष्काळ संपवायचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक भाकीत वर्तवलय.
भारतीय कॅम्पमधील कोहलीच्या खेळावर लक्ष असेल. विराट कोहली 30 धावांच्या पुढे गेला, तर तो शतक झळकवू शकतो, असं मायकल वॉन म्हणाला. “भारतीय संघातील विराट कोहलीच्या खेळावर लक्ष असेल. काही वर्षांपूर्वी त्याने याच मैदानात शतक झळकावलं होतं. विराट कोहली 30 च्या पुढे गेला,. तर तो शतक झळकवू शकतो, ज्याची तो बऱ्याच काळापासून वाट पाहतोय” असं वॉन क्रिकबझशी बोलताना म्हणाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहवर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. रोहित शर्मा अजूनही कोविडमधून बरा झालेला नाही. सराव सामन्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल होती.