IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. आधी कर्णधार विराट कोहलीचं (50) अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने (57) जोरदार फटकेबाजी करत ठोकलेलं अर्धशतक, याच्या जोरावर भारतीय संघाने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताची स्थिती मजबूत केली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपायला एकच षटक बाकी असताना उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद करत दिवसाची गोड सांगता केली. आजही भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात आक्रमक मारा केला.
पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था 5 बाद 62 अशी झालेली असताना मात्र ऑली पोपने (81) मोर्चा सांभाळला. त्याने जॉनी बेअरस्टो (33), मोईन अली (35) या दोघांसोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत इंग्लंडला सुस्थितीत नेऊन ठेवलं. अखेरच्या षटकात ख्रिस वोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला 290 धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारताकडून या डावात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली आहे. दिवसअखेर रोहित शर्मा (20) आणि लोकेश राहुलने (22) 16 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. अद्याप इंग्लंड 56 धावांनी आघाडीवर आहे.
टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकलेली असताना, लॉर्ड शार्दुल ठाकूर मात्र त्यांच्या गोलंदाजांना भिडला. नुसता भिडला नाही तर त्याने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला 200 धावांच्या आसपास मजल मारता आली. शार्दुलआधी इंग्लंडमध्ये सर्वात जलद ठोकण्याचा रेकॉर्ड कपिल देव (30 चेंडू) यांच्या नावावर आहे. या यादीत आता शार्दुलचंदेखील नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. शार्दुलने या डावात 36 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा चोपल्या.
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण ही आघाडी कायम ठेवण्यात तिसऱ्या कसोटीत भारताला यश आलं नाही. तिसरी कसोटी भारताने एक डाव 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडीसाछी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली आहे. दिवसअखेर रोहित शर्मा (20) आणि लोकेश राहुलने (22) 16 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारली आहे.
इंग्लंडला 290 धावांत रोखल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा – लोकेश राहुल जोडी मैदानात उतरली आहे.
अर्धशतक फटकावणाऱ्या ख्रिस वोक्सला धावबाद करुन रिषभ पंतने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला आहे. इंग्लंडने 290 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे त्यांना 99 धावांची आघाडी मिळाली आहे.
रवींद्र जाडेजाने ऑली रॉबिन्सनला 5 धावांवर बाद त्रिफळाचित करत इंग्लंडला 9 वा झटका दिला आहे. (इंग्लंड 255/9)
भारताला मोठं यश मिळाल आहे, शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या ऑली पोपला 81 धावांवर असताना शार्दुल ठाकूरने त्रिफळाचित केलं. (250/8)
इंग्लंडचा 7 वा गडी बाद झाला आहे. रवींद्र जाडेजाने मोईन अलीला 35 धावांवर असताना रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 222/7)
ऑली पोप (72) आणि मोईन अली (29) या दोघांनी 7 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी (64) करत इंग्लंडचा डाव सावरला आहे. त्यामुळे इंग्लंडने 200 धावांचा टप्पादेखील पार केला आहे. (इंग्लंड 215/6)
टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करत असलेली जॉनी बेअरस्टो – ऑली पोप जोडी फोडण्यात टीम इंडिया यशस्वी झाली आहे. मोहम्मद सिराजने बेअरस्टोला 37 धावावर असताना पायचित केलं. (इंग्लंड 151/6)
दुपारच्या जेवणानंतरही ओली पोप (45) आणि जॉनी बेअस्टोने (37) फटकेबाजी सुरुच ठेवली आहे. या दोघांच्या नाबात 88 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने दिडशतकी मजल मारली आहे. (इंग्लंड 15/5)
नाबाद 75 धावांच्या भागीदारीसह ओली पोप (38) आणि जॉनी बेअरस्टोने ()34 इंग्लंडचा डाव सावरला आहे. (इंग्लंड 127/5)
अवघ्या 62 धावांत सुरुवातीचे 5 फलंदाज बाद झाल्यानंतर ओली पोप (31) आणि जॉनी बेअरस्टोने (32) इंग्लंडचा डाव सावरला आहे. दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची भागीदारी रचली आहे. (इंग्लंड 127/5)
इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. खेळपट्टीवर सेट झालेल्या डेव्हिड मलानला उमेश यादवने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 62/5)
भारतीय संघाला आजच्या दिवसातलं पहिलं यश मिळालं आहे. आजच्या दुसऱ्याच षटकात उमेश यादवने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टनला विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 53/4)
पहिल्या दिवसअखेर नाबाद परतलेली इंग्लंडची डेव्हिड मलान – क्रेग ओव्हर्टन जोडी मैदानात उतरली आहे. भारतीय कर्णधाराने मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला आहे.