मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) पासून भारतीय क्रिकेट वर्तुळात एका गोलंदाजाची बरीच चर्चा आहे. ते नाव म्हणजे उमरान मलिक. उमरान मलिकच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड वेगात चेंडू टाकण्याची क्षमता. ताशी 157 किमी वेगाने उमरान मलिक (Umran Malik) गोलंदाजी करु शकतो. याच वेगाने त्याने स्वत:ची दहशत निर्माण केलीय. सध्या तो भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्याच्या मालिकेतून त्याने डेब्यु केला. दुसऱ्या टी 20 मॅच मध्ये त्याने शेवटच षटक टाकताना आपली छाप उमटवली. उमरान मलिक मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. तो आयपीएल मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळतो. हीच जम्मू एक्स्प्रेस आता इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. डर्बीशायर विरुद्धच्या सराव सामन्यात उमरान मलिकने आपल्या वेगाची दहशत दाखवून दिली.
भारताचे दोन संघ इंग्लंड मध्ये आहेत. सीनियर संघाचा एजबॅस्टन येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना सुरु आहे, काल ऋषभ पंतने इंग्लंड विरुद्ध शानदार शतक झळकावलं. भारताचा कसोटी सामना जिथे सुरु आहे, तिथून 57 किमी अंतरावर भारतीय संघाचा डर्बीशायर विरुद्ध पहिला टी 20 सराव सामना झाला. या मॅच मध्ये दीपक हुड्डा आणि उमरान मलिकने छाप उमटवली. एजबॅस्टवर पंत-जाडेजाची चर्चा होती, तर डर्बी मध्ये दीपक हुड्डा, उमरान मलिकची.
Umran Malik ??
? @DerbyshireCCC pic.twitter.com/y54gQAywYp
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) July 1, 2022
दिनेश कार्तिकने पावरप्लेच्या शेवटच्या षटकात उमरान मलिककडे चेंडू सोपवला. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर ल्युस ड्यू प्लूने चौकार खेचले. पण त्याच षटकात उमरानने त्याला माघारी धाडलं. त्याने फक्त 9 धावा केल्या. उमरान मलिकचं सगळे इतकं कौतुक का करतात? त्याच्या गोलंदाजीत काय ताकत आहे, ते त्याने काल पुन्हा दाखवून दिलं. सेट झालेल्या ब्रुक गेस्टला त्याने क्लीन बोल्ड केलं. ब्रुकने 23 धावा केल्या. उमरान मलिकने 4 षटकात 31 धावा देत दोन विकेट घेतल्या. हे दोन्ही विकेट्स घेताना त्याने समोरच्या फलंदाजाची दांडी गुल केली. भारताने डर्बीशायर विरुद्धचा हा सामना 20 चेंडू आणि सात विकेटने जिंकला.