मुंबई: भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) काल फिल्डिंग मध्ये कमाल केली. याआधी पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. रवींद्र जाडेजा डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघाल आला. पण आता तो ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. संघाला गरज असताना त्याने फलंदाजी, गोलंदाजीत नेहमीच महत्त्वाचं योगदान दिलं आहे. काल हाँगकाँग विरुद्धच्या (IND vs HKG) सामन्यात त्याने बॅट, बॉलने नाही, तर फिल्डिंग मध्ये मास्टर क्लास दाखवला. रवींद्र जाडेजा उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. रवींद्र जाडेजाच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे हाँगकाँगचा कॅप्टन निझाकत खानला पॅव्हेलियन मध्ये परतावं लागलं. रवींद्र जाडेजा बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करत होता. तिथून त्याने केलेल्या अचूक थ्रो ने हाँगकाँगचा कॅप्टन निझाकत खानचा खेळ संपवला. जाडेजाच्या अचूक थ्रो मुळे निझाकत खान अवघ्या 10 रन्सवर तंबूत परतला.
रवींद्र जाडेजा उत्तर क्षेत्ररक्षक आहे, ते त्याने काल पुन्हा सिद्ध केलं. त्याने मैदानावर दाखवलेली चपळाई कौतुकास्पद आहे. समोर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू निझाकत खानने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी रवींद्र जाडेजा उभा होता. निझाकत खानने त्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याने क्रीझ सोडला होता. जाडेजाच्या हातात चेंडू गेला. निझाकत खानने पुन्हा क्रीझ मध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण रवींद्र जाडेजाच्या रॉकेट थ्रो ने निझाकत खानचा खेळ संपवला. जाडेजाच्या थ्रो ने थेट स्टम्पसचा वेध घेतला. अगदी काही सेकंदात हे सगळं घडलं.
Replay of Nizakat’s run out.
Hong Kong needs to remember they’re playing with the big boys now. Jadeja is an arm you do NOT run on. pic.twitter.com/BbLss6vwzu
— Sweary Aaron is free at last! (@TripperheadToo) August 31, 2022
रनआऊटचा क्लोज कॉल नेहमीच तिसऱ्या अंपायरकडे सोपवला जातो. स्लो मोशन व्हिडिओत निझाकत खान क्रीझ मध्ये येण्याआधीच बेल्स उडाल्याच दिसत होतं. त्यामुळे पंचानी निझाकत बाद असल्याचा निर्णय दिला. रवींद्र जाडेजाने मास्टर क्लास फिल्डिंगच प्रदर्शन केलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 192 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या बळावर भारताने हे लक्ष्य उभं केलं. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 5 बाद 152 धावा करु शकला. भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला.