मुंबई: सध्या टीम इंडिया (Team India) मध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे अंतिम प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुक्ता असते. एखाद्या खेळाडूला निवडलं, एखाद्या प्लेयरला बाहेर बसवलं. तर तो चर्चेचा विषय ठरतो. काल हाँगकाँग (IND vs HKG) विरुद्धच्या सामन्यातही असंच घडलं. टीम इंडिया काल आशिय कप स्पर्धेत हाँगकाँग विरुद्ध दुसरा सामना खेळली. या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग 11 वरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला (Rishabh Pant) अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. आता हाँगकाँग विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं, त्यावरुन क्रिकेटच्या जाणकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बुधवारी दुबईत हाँगकाँग विरुद्ध सामना झाला. टॉसच्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने प्लेइंग 11 बद्दल माहिती दिली. संघात फक्त एकमेव बदल करण्यात आला होता. हार्दिक पंड्याला आराम देऊन ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आल्याचं रोहितने सांगितलं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयामुळे ऋषभ पंतला नक्कीच आनंद झाला. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना हा निर्णय पटला नाही. त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले.
ऋषभ पंतच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळाली पाहिजे होती. हार्दिक पंड्याला आराम दिलाय, तर त्याच्याजागी दीपक हुड्डाला प्लेइंग 11 मध्ये निवडणं गरजेचं होतं. दीपक हुड्डा गोलंदाजी सुद्धा करु शकतो. त्याच्यामुळे टीम इंडियाला ऑफ स्पिन गोलंदाजीचा एक पर्याय मिळतो. पंतला हार्दिकच्या जागी स्थान देणं, योग्य निर्णय नाही, असं टॉस नंतर गौतम गंभीर म्हणाले. स्टार स्पोर्ट्सवर ते बोलत होते.
गौतम गंभीर यांनी पंतच्या निवडीवर आक्षेप घेतला असला, तरी त्याला संधी मिळाली पाहिजे, असं सुद्धा त्यांचं मत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतच्या जागी दिनेश कार्तिकला स्थान देण्याचा निर्णय गंभीर यांना पटला नव्हता. तोच मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा मांडला. पंत पहिल्या सामन्यापासून टीम मध्ये असला पाहिजे. दिनेश कार्तिकच्या आधी त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे, असं गौतम गंभीर यांचं मत आहे. पंतने कसोटी मध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण वनडे मध्येही त्याच्या प्रदर्शनात सुधारणा झालीय, अशा शब्दात गंभीरने पंतचं कौतुक केलं.