मुंबई: भारताने विजय मिळवून आयर्लंड दौऱ्याची (IND vs IRE) सुरुवात केली आहे. टीम इंडियाने रविवारी पहिल्या टी 20 मध्ये आयर्लंडला 7 विकेटने हरवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात एक वेगळी गोष्ट पहायला मिळाली. टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड सलामीला आला नाही, त्याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. आता यामागचं कारण समोर आलं आहे. स्वत: हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सांगितलं. सामना सुरु असताना ऋतुराज गायकवाडच्या पायाला दुखापत झाली होती, असं हार्दिकने सांगितलं. डबलिनमध्ये झालेल्या सामन्यात हार्दिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडला 108 धावांवर रोखलं. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 12 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) सोबत दीपक हुड्डा सलामीला आला होता. प्रत्येकाला प्रश्न पडला होता की, ऋतुराज गायकवाड ओपनिंगला का नाही आला? मॅच संपल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
ऋतुराज गायकवाडला सौम्य दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या फिटनेससाठी आम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नव्हतं. आम्ही फक्त छोटासा बदल केला. प्रत्येक फलंदाजाला त्याच्या ठरलेल्या पोजिशनपेक्षा एक क्रमांक वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं.
ऋतुराजच्या जागी दीपक हुड्डा फलंदाजीसाठी आला. तो तिसऱ्या क्रमांकावर येणार होता. हुड्डाने 29 चेंडूत नाबाद 47 धावा फटकावल्या. संघाला विजयी करुनच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटच्या क्षणी ओपनिंगला पाठवूनही चांगली कामगिरी केली. म्हणून रोहितने त्याचं कौतुक केलं.
भुवनेश्वर कुमारने आयर्लंडमधल्या वातावरणाचा चांगला फायदा करुन घेतला. त्याने दोन्ही बाजूला चेंडू स्विंग केला. त्यानेच आयर्लंडचा कॅप्टन अँडी बालर्बिनीला बाद केलं. भुवनेश्वर कुमारने नेहमीप्रमाणे या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन ओव्हर्समध्ये 16 धावा देऊन एक विकेट काढली. एका निर्धाव षटकही त्याने टाकलं. एकाबाजूला भुवनेश्वर कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. त्याचवेळी चेंडूचा वेग दाखवणाऱ्या स्पीडोमीटरमुळे सोशल मीडियाला चांगलीच उत्तेजना मिळाली. स्पीडोमीटरने भुवनेश्वरकुमार प्रतितास 200 किमी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असल्याचं दाखवलं. एकदा नाही, दोनचा स्पीडोमीटरवर तेच दिसलं. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.