सिडनी: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा विजयी सिलसिला कायम आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तान त्यानंतर आता नेदरलँड विरुद्ध विजय मिळवला. वर्ल्ड कप टुर्नामेंटमधला टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं.
किती धावांनी जिंकला सामना?
रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर खेळपट्टी पाहून फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा फटाकवल्या. टीम इंडियाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना 56 धावांनी जिंकला.
फलंदाजांच्या कामगिरीवर गोलंदाजांचा कळस
रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी आज दमदार फलंदाजी केली. तिघांनी अर्धशतक झळकावून एक चांगली धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावला. भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेलने सुरुवात करुन दिली.
भारतीय गोलंदाजांची कमाल
टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेलने नेदरलँडच्या सलामीच्या जोडीला 20 धावांमध्ये तंबूत पाठवलं. नेदरलँडकडून टीम प्रिंगलने सर्वाधिक 20 धावा केल्या. नेदरलँडच्या डावात एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
T20 WC 2022. India Won by 56 Run(s) https://t.co/Zmq1aoJthi #INDvNED #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 27, 2022
रोहितची कॅप्टन इनिंग
रोहित आज कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार होते. हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात रोहित आऊट झाला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली.
सूर्याची आक्रमक बॅटिंग
त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. सूर्याने आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फलंदाजी सुरु केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने आजच्या सामन्यात 25 चेंडूत 51 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
विराटची दुसरी हाफ सेंच्युरी
विराट कोहलीने आज टी 20 वर्ल्ड कपमधील सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. त्याने सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन 44 चेंडूत 62 धावा वसूल केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार लगावले.