नवी दिल्ली – T20 चा सामना म्हटला की, मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते. चौकार-षटकारांचा पाऊस ठरलेला असतो. पण काल लखनौमध्ये भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात असं काही पहायला मिळालं नाही. 40 ओव्हरच्या खेळात दोन्ही टीम्सनी मिळून फक्त 14 चौकार लगावले. दोन्ही इनिंगमध्ये मिळून 200 रन्स झाले. हा T20 चा सामना वाटलाच नाही. प्रेक्षकांना टीम इंडियाकडून अपेक्षित खेळ या सामन्यात पहायला मिळाला नाही. फक्त निकाल मनासारखा लागला, हेच काय ते समाधान. स्पिनर्ससाठी स्वर्ग ठरलेल्या या विकेटवर सूर्यकुमार यादवच्या झुंजार खेळाच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडवर 6 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
एकही सिक्स नाही
ही मॅच T20 फॉर्मेटला बिलकुल साजेशी नव्हती. टी 20 इंटरनॅशनलच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही पैकी एकही टीम सिक्स मारु शकली नाही. या मॅचमध्ये बॅटिंग खूपच रटाळवाणी ठरली.
इशान-गिल पुन्हा फेल
100 धावांच लक्ष्य खूप छोटं वाटत होतं. पण टीम इंडियासाठी हे छोटं लक्ष्य खूप अवघड ठरलं. मागच्या टी 20 सामन्याप्रमाणे या मॅचमध्ये सुद्धा इशान किशन आणि शुभमन गिलची ओपनिंग जोडी फ्लॉप ठरली. गिल आधी आऊट झाला. पण इशानने जास्त निराश केलं. त्याने 32 चेंडूत फक्त 19 धावा केल्या. बेजबाबदारपणामुळे तो रनआऊट सुद्धा झाला. भारतीय स्पिनर्सप्रमाणे न्यूझीलंडच्या स्पिनर्सनी सुद्धा सहजासहजी धावा करु दिल्या नाहीत.
सूर्याचा संघर्ष
11 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने राहुल त्रिपाठीचा विकेट गमावला. त्यावेळी टीमची धावसंख्या 50 होती. सूर्यकुमार क्रीजवर आला. नेहमीच्या स्टाइलमध्ये सूर्या टीम इंडियाला विजय मिळवून देईल असं वाटत होतं. पण तो सुद्धा संघर्ष करताना दिसला. स्वीप-रिव्हर्स स्वीपचे फटके चालले नाहीत. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. पण त्याची सुद्धा तीच हालत होती. लास्ट ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. अखेरीस 2 चेंडूत 3 धावा असं समीकरण झालं.
करो या मरो चेंडू
भारतासाठी करो या मरो असा हा चेंडू होता. सूर्याने पूण ताकदीने मिड ऑफच्या वरुन चौकार मारला व टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
तो मॅच विनिंग चौकार
सूर्याने त्याच्या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त 1 चौकार मारला. तो मॅच विनिंग चौकार ठरला. 31 चेंडूत 26 धावा काढून तो नाबाद राहिला. त्याने कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत नाबाद 31 धावांची भागीदारी करुन टीमचा पराभव टाळला.
भारतीय स्पिनर्सच वर्चस्व
न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. टीम इंडियाने या सामन्यात 4 स्पिनर्सना संधी दिली होती. लगेच त्याचा परिणाम दिसून आला. प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलेल्या युजवेंद्र चहलने विकेटची सुरुवात केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि दीपक हुड्डाने जखडून ठेवलं. पहिल्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या 4 बाद 48 धावा झाल्या होत्या. 20 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीमने 8 विकेट गमावून फक्त 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कॅप्टन मिचेल सँटनरने सर्वाधिक 19 धावा केल्या.